Nitin Gadkari On EV Bike : पेट्रोल डिझेल आणि इंधनाच्या वाढत्या दरामुळं आता इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत आहे. सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र इलेक्ट्रिक वाहनं खासकरुन इलेक्ट्रिक बाईक्सच्या दुर्घटना वाढू लागल्या आहेत. यात प्रामुख्यानं ई बाईक्सला अचानक आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. गडकरी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या अनेक दुर्घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत हे सर्वात दुर्दैवी आहे.
या घटनांची चौकशी करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी शिफारसी करण्यासाठी आम्ही तज्ञांची समिती स्थापन केली आहे, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.
गडकरी यांनी म्हटलं आहे की, अहवालाच्या आधारे, आम्ही संबंधित कंपन्यांना आवश्यक आदेश जारी करू. आम्ही लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता-केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहोत, असं ते म्हणाले.
त्यांनी म्हटलं आहे की, कोणत्याही कंपनीने त्यांच्या प्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास मोठा दंड आकारला जाईल आणि सर्व सदोष वाहने परत बोलावण्याचे आदेशही दिले जातील, असं गडकरी यांनी सांगितलं आहे.
गडकरींनी म्हटलं आहे की, वाहन कंपन्यांनी त्यांच्या दोष असलेल्या वाहनांच्या सर्व बॅच ताबडतोब परत मागवाव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आमचे सरकार प्रत्येक प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, असं गडकरींनी म्हटलं आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI