Airbags Mandatory In Cars: केंद्र सरकारने कारमध्ये सहा एअरबॅग बंधनकारक असल्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारचा हा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. मात्र आता ही तारीख पुढे वाढवण्यात आली आहे. कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्याची तारीख 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात येत असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. म्हणजेच 1 ऑक्टोबर 2023 पासून सर्व कारमध्ये 6 एअरबॅग असणे बंधनकारक असेल.  


एअरबॅग म्हणजे नेमकं काय? 


एअरबॅग्स कार अपघातादरम्यान होणाऱ्या जोरदार धक्क्यांपासून प्रवाशांची छाती, चेहरा आणि डोके सुरक्षित ठेवण्याचे काम करतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, एअरबॅग्स डॅशबोर्ड, स्टीयरिंग आणि आरशांमध्ये अशी पॅड केलेली भिंत तयार करतात, ज्यामुळे गंभीर दुखापतीचा धोका कमी होतो.


6 एअरबॅग्जमुळे कार महागणार 


जून महिन्यात मारुतीचे चेअरमन आरसी भार्गव म्हणाले होते की, 6 एअरबॅग्जमुळे स्वस्त वाहनेही महाग होतील. आरसी भार्गव म्हणाले होते की, छोट्या कारमध्ये 6 एअरबॅग लावल्या तरी त्यांची किंमत 60 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एअरबॅगच्या किमतीबाबत वेगळीच माहिती दिली आहे. नितीन गडकरी यांनी लोकसभेत याबाबत माहिती देताना सांगितलं होत की, वाहनांमधील एअरबॅगची किंमत केवळ 800 आहे. पण कार निर्माते यावर 15,000 रुपये का घेत आहेत? नितीन गडकरी यांच्या मते एका एअर बॅगची किंमत 800 रुपये आणि 4 एअरबॅगची किंमत 3200 रुपये असावी. ते पुढे म्हणाले की, जर काही सेन्सर आणि सपोर्टिंग ऍक्सेसरीज सोबत बसवले तर एअरबॅगची किंमत 500 रुपयांपर्यंत वाढू शकते. त्यानुसार एअरबॅग बसवण्याचा खर्च 1300 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 4 एअरबॅगची किंमत 5200 रुपये असावी.


बाहेरून एअरबॅग बसवल्यास काय होईल 
 
सर्व कार निर्माता कंपन्या संपूर्ण टेस्ट झाल्यानंतर कारमध्ये एअरबॅग देतात. सर्व कारसाठी एअरबॅग वेगवेगळ्या प्रकारे बनविल्या जातात, त्यानंतर कारची क्रॅश चाचणी केली जाते आणि त्यात यशस्वी झाल्यानंतरच एअरबॅग्ज कारमध्ये बसवल्या जातात. मात्र जर तुम्हाला बाहेरून एअरबॅग्ज बसवल्या असतील तर अशावेळी क्रॅश टेस्टची सुविधा तुम्हाला मिळणार नाही. अशातच शक्यता असते की, गरजेच्या वेळी एअरबॅग उघडत नाही. तसेच गरज नसताना ते अचानक उघडू ही शकते. याशिवाय जर तुम्हाला बाहेरून एअरबॅग्ज बसवल्या तर तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागू शकते. आता पैसे वाचवण्यासाठी, तुम्ही तुमच्या कारचे स्टिअरिंग बदलू शकता आणि एअरबॅगसह दुसरे विकत घेऊ शकता. यातही हा पर्याय केवळ काही कारमध्ये उपलब्ध आहे. आता जर तुम्ही बाहेरून एअरबॅग्स बसवण्याचा खर्च काढला, तर तुम्हाला नवीन कार इतकाच खर्च येईल.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI