औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. यातील राजेंद्र जैन यांनी वेगवेगळ्या 24 बँकांमध्ये तब्बल 72 अकाऊंट उघडल्याचंही स्पष्ट झालं आहे .यापैकी काही अकाऊंट त्याची पत्नी, मुलगा आणि ड्रायव्हरच्या नावावर देखील आहेत. याबरोबरच राजेंद्र जैन याने चोरी केलेलं सोनं विकून तब्बल 14 चार चाकी गाड्या विकत घेतल्याचंही समोर आलेलं आहे.
सोन्याच्या पैशातून विकत घेतलेल्या याच चारचाकी गाड्यातून तो त्याचं ऑफिस देखील चालवत असल्याची माहिती आहे. याशिवाय औरंगाबाद शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तीन फ्लॅटही त्याने खरेदी केले आहेत. पोलिसांनी या सगळ्या अकाऊंटबद्दलची माहिती बँकांकडून मागवली आहे. याशिवाय कुठे त्याने आणखी लॉकरमध्ये सोनं ठेवलं आहे का याचीही औरंगाबाद पोलीस चौकशी करत आहेत.
काय आहे प्रकरण?
औरंगाबादच्या वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शाखेत तब्बल 58 किलो सोन्याची चोरी झाल्याचा प्रकार समोर होता. औरंगाबाद समर्थ नगर शाखेच्या मॅनेजरनेच ही चोरी केल्याचंही उघड झालं होतं. चोरी केलेल्या 58 किलो दागिन्यांची किंमत जवळपास 21 कोटीच्या घरात आहे. विशेष म्हणजे शाखेचा मॅनेजर अंकुर राणे याने शहरातील साडी व्यापारी लोकेश जैन आणि राजेंद्र जैन या दोघांच्या मदतीनं ही चोरी केली होती. ऑडिटनंतर आणखी नऊ किलो सोनं या शाखेतून चोरीला गेल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला असून आणखी कुठे सोनं लपवून ठेवलं आहे का? याबाबतही पोलीस तपास करत आहेत.