औरंगाबाद : जालना येथील घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची पाहणी करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) मंगळवारी (5 सप्टेंबर) औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) जागोजागी अस्वच्छता पाहून रुपाली चाकणकर चांगल्याचं संतापल्या. जिथे सामान्य नागरिक उपचारासाठी येतात तिथे स्वच्छता ही अतिशय मूलभूत अपेक्षा आहे. तिथेच जर कचऱ्यांचा ढिगारा असेल तर रुग्णांच्या बाबतीत कशी काळजी घेत असतील, असं म्हणत त्या अधिकाऱ्यांवर भडकल्या. तसेच, अधिष्ठातांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आपण वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे केली असल्याचं चाकणकर 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाल्यात.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु असताना पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. या लाठीहल्ल्यात अनेक गावकरी जखमी झाले आहेत. दरम्यान, याच जखमी रुग्णांची भेट घेण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर घाटी रुग्णालयात आल्या होत्या. मात्र, घाटीमध्ये  गेल्यानंतर त्यांना ठिकठिकाणी अस्वच्छता, कचऱ्याचे ढिग, गुटखा-तंबाखूच्या पिचकाऱ्या दिसून आल्या. हा प्रकार बघून त्या अधिकाऱ्यांवर चांगल्याच. वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय कल्याणकर यांच्याकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. जिथे आपण माणसांना उपचारासाठी आणतो तिथेच कचरा करणे, गुटखा तंबाखूच्या पिचकाऱ्या मारणे योग्य नाही. रुग्णालयाच्या या अवस्थेसाठी जबाबदार अधिष्ठातांवर कारवाई व्हावी, अशी मागणी आयोगाच्या वतीने राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे करत असल्याचं चाकणकर म्हणल्या.


रुग्णालयात जाऊन जखमींची घेतली भेट


जालना इथे मराठा क्रांती मोर्चा आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये जखमी झालेल्या महिलांची औरंगाबाद येथील गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन चाकणकर यांनी भेट घेतली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारमध्ये मोठ्या प्रमाणात महिला देखील जखमी झाल्या होत्या. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना राज्य महिला आयोगाने तातडीने एक तारखेला रात्री दिले होते. त्यानंतर सातत्याने राज्य महिला आयोग या घटनेत जखमी झालेल्या महिलांवर सुरु असलेल्या उपचाराबद्दल त्या त्या रुग्णालयांसमवेत समन्वय साधत होते.दरम्यान, मंगळवारी चाकणकर यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन पाहणी केली.


काय म्हणल्या चाकणकर?


जालना येथील पोलिसांच्या लाठीमारमध्ये जखमी झालेल्या महिलांची मी भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र घाटी रुग्णालयात गेल्यावर तिथे प्रचंड अस्वच्छता पाहायला मिळाली. सर्वत्र अशीच काही परिस्थिती होती. याबाबत मी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे तक्रार केली असून, तसं पत्र देखील त्यांना पाठवणार आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची देखील मागणी करणार असल्याचं चाकणकर म्हणाले आहेत.