जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी सोमवारी (4 सप्टेंबर) मुंबईत (Mumbai) काही बैठका देखील झाल्या. तर, आज सरकारचं एक शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यासह उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करणार आहे. यासाठी मुंबईहून निघालेलं हे शिष्टमंडळ औरंगाबाद विमानतळावर दाखल झालं आहे. तसेच औरंगाबाद इथून हे शिष्टमंडळ कारने अंतरवाली सराटी गावाकडे निघाले आहे. या शिष्टमंडळात रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा समावेश आहे. 


मनोज जरांगे यांच्यासह उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी आज (05 सप्टेंबर) सरकारचं शिष्टमंडळ आले आहे. यापूर्वी देखील एकदा गिरीश महाजन यांना पाठवून सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र त्यात यश मिळाले नव्हते. त्यामुळे आज दुसऱ्यांदा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात जात आहे. त्यामुळे आजच्या चर्चेत काही तोडगा निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तसेच सरकारच्या शिष्टमंडळाकडून कोणकोणते प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत?, उपोषणकर्त्यांच्या कोणत्या मागण्या पूर्ण केल्या जाणार आहेत? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 


मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या


शासनाने एक स्पष्टीकरण पत्र काढावे. त्यात, "महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गात क्र. 83 वरील कुणबी जाती-अंतर्गत "मराठा कुणबी वा कुणबी मराठा" ही जात समाविष्ट आहे. सदरील मराठा कुणबी वा कुणबी मराठी ही जात म्हणजेच मराठा जात आहे, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. करिता मराठवाडा (औरंगाबाद), महसुली विभागातील मराठा जातीचा उल्लेख असलेल्या व्यक्तींना “कुणबी” जातीचे दाखले देण्यात यावेत," अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तर ही मागणी मान्य देखील झाली असल्याचे बोलले जात आहे. पण फक्त दाखले नव्हे तर त्यासोबत आरक्षण देखील मिळाले पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.  


ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त


मनोज जरांगे यांच्यासह उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ औरंगाबादहून अंतरवाली सराटी गावाकडे निघाले आहे. त्यामुळे या शिष्टमंडळाला आंदोलकांनी अडवू नयेत यासाठी पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर तासा भरात हे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी गावात पोहोचणार आहे.


हेही वाचा


Bacchu Kadu : ...नाहीतर पुन्हा सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही; बच्चू कडू थेटच म्हणाले