खैरेंची बुद्धी भ्रष्ट झाल्याने ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. खैरे ज्या नेत्यांनी मदत केली असे सांगतात ते दानवे यांचे जवळचे नेते आहेत, असेही जाधव म्हणाले. खैरै यांना माझं चॅलेंज आहे. सासऱ्यांनी मला 50 लाख दिले हे सिध्द केले तर मी सांगेल ते करायला तयार आहे, असेही ते म्हणाले. मला सासूने ना मदत केली ना सासऱ्याने. मी रावसाहेब दानवे यांच्या जावयाच्या आधी रायभान जाधव यांचा मुलगा आहे. त्यामुळे ही निवडणूक मी स्वतःच्या जीवावर लढलो आहे, असेही जाधव यांनी सांगितले.
रावसाहेब दानवे यांनी हर्षवर्धन जाधव यांना निवडणुकीत रसद पाठवली, असल्याचा आरोप खैरे यांनी केला होता. 50 लाख रुपये पकडले होते ते कोणाचे होते, हे हर्षवर्धन यांनी सांगावं, असंही खैरे म्हणाले होते. दानवे रोज हर्षवर्धन यांना रोज पैसे पाठवत होते. मी याचा आढावा घेतला आहे, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती धर्मऐवजी जावई धर्म पाळला, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी त्याआधी केला होता. चंद्रकांत खैरे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याकडे तक्रार देखील केली आहे.
VIDEO | जावयासाठी रावसाहेब दानवेंनी सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला? | औरंगाबाद | स्पेशल रिपोर्ट
मात्र यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी आपल्याला कोणतीही मदत केली नाही, असा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. त्यानंतर हर्षवर्धन जाधवांची प्रचारादरम्यानची एक क्लिप वायरल झाली होती. दानवेंनीच पूर्ण भाजप माझ्यामागे उभं करण्याचं आश्वासन दिलं होतं, असा दावा हर्षवर्धन जाधवांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले होते.
आधी काय म्हणाले होते खैरे?
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे हे भाजप-शिवसेना युतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तरीही रावसाहेब दानवे यांचे जावई आणि शिव स्वराज्य पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव हे देखील रिंगणात उतरले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असूनही रावसाहेब दानवे यांनी हर्षवर्धन जाधव यांना रोखलं नाही. जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी दानवेंविरुद्ध निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे यांनी अर्जुन खोतकर यांची समजूत काढून त्यांना बंडखोरीपासून रोखलं. मात्र दानवेंनी या सहकार्याची जाणीव ठेवली नाही आणि जावयालाही आवरलं नाही, अशी तक्रार चंद्रकांत खैरेंनी केली आहे.
भाजपचं स्पष्टीकरण
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी प्रयत्न केले आणि युतीधर्माचे पालन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूचनेवरुन आपण स्वतः या मतदारसंघात तीन दिवस मुक्काम करुन खैरेंच्या विजयासाठी भाजप नेते-कार्यकर्त्यांशी संपर्क केला आणि पत्रकार परिषद घेऊन जाहीर आवाहनही केलं, असा दावा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केला होता.