Aurangabad Crime News : मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2023) एक दिवस आधी औरंगाबाद शहर पोलिसांनी नायलॉन मांजाच्या (Nylon Manja) विरोधात मोठी कारवाई केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी साठेबाजांवर धाडी टाकून पोलिसांनी नायलॉन मांजा जप्त केला आहे. औरंगाबाद शहरातील सिटी चौक आणि जिन्सी भागातील दोन गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकत तब्बल 15 लाखांचा मांजा जप्त करून आरोपींना अटक केली. 


नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहर पोलिसांकडून प्रत्येक ठाण्यात उपनिरीक्षकांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान मकरसंक्रांतीच्या एक दिवस आधी या पथकांनी जोरदार कारवाई केली आहे. शहर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत एकूण 15 लाखांचा मांजा जप्त केला असून, आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. या करवाईमुळे नायलॉन मांजा विकणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर पोलिसांकडून अजूनही नायलॉन मांजा विकणाऱ्यांचा शोध घेतला जात असून, कारवाई अशीच सुरु राहणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.  


सातारा पोलिसांची कारवाई  


सातारा पोलीस ठाणे हद्दीत, हमिदीया गार्डन, बीड बायपास येथे एक महिला घरात मांजा ठेवून विक्री करीत असल्याची खबर मिळाल्यावर पथकाने उपनिरीक्षक देविदास शेवाळे, सहायक फौजदार नंदकुमार भंडारे यांच्या पथकाने कारवाई करून सुरया बेगम जफर खान (56) या महिलेच्या घरातून 35 हजारांचा मांजा जप्त केला. 


गुन्हे शाखेची कारवाई! 


गुन्हे शाखा आणि जिन्सी पोलिसांनी देखील कारवाई करत दोन सख्ख्या भावांना बेड्या ठोकल्या आहेत. कदीर अहमद नजीर अहेमद आणि मुदस्सीर अहमद नजीर अहेमद (वय 43, रा. आजम कॉलनी, रोशनगेट) अशी या आरोपींची नावे आहेत. यावेळी कदीर अहमदकडून साडेसहा लाखांचा तर, जिन्सी मुदस्सीर अहमदकडून साडेआठ लाखांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापना


नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यामुळे औरंगाबाद शहर पोलिसांकडून नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. शहर हद्दीतील 17 पोलीस ठाण्यात विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून, त्यांना नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच गुन्हे शाखेकडून देखील एका पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Aurangabad : नायलॉन मांजाला नाही म्हणा, औरंगाबाद शहर पोलिसांचे आवाहन