औरंगाबाद : मुंबई आणि पुण्यानंतर आता मराठवाड्यातही कोरोनाचा धोका वाढतोय. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत कोरोना बाधिताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. बुधवारी एकाच दिवसात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात तब्बल 3605 रुग्ण आढळले. सर्वत्र लसीकरण होऊनही वाढती रुग्णसंख्या चिंतेत भर टाकणारी आहे.


मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यासह अनेक मोठी शहरं मागच्या काही दिवसांत कोरोना रुग्णासंख्येच्या बाबतीत पुढे होती. मात्र आता यात छोट्या शहरांसह ग्रामीण भागाचाही समावेश होताना दिसतोय. काल मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये एकाच दिवशी 1097 रुग्ण आढळले. त्या पाठोपाठ लातुरात 782, नांदेड 758, उस्मानाबाद 334, परभणी 235, बीड 205, जालना 109 आणि हिंगोलीत 85 अशी रुग्णवाढ झाली असून वाढत्या रुग्णसंख्येमुळे संबंध मराठवाड्याची चिंता वाढलीय. त्यामुळे प्रशासनासमोरील आव्हानही वाढलंय. तर नागरिकांना नियमांचे पालन करून संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.


एकीकडे कोरोना बाधितांचे आकडे वाढतायत तर दुसरीकडे ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत. परभणीत दोन महिलांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. तर औरंगाबादमध्ये आतापर्यंत 20, उस्मानाबाद 11, लातूर, नांदेड, जालना प्रत्येकी 3 आणि परभणी 2 असे एकूण 42 रुग्ण आढळले आहेत. कोरोनावर औषध नाही केवळ लसीकरण करणे हाच पर्याय. मात्र त्यातही मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत लसीकरणाचा पहिला डोस हा 70 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांना देण्यात आलाय. मात्र दुसऱ्या डोसची टक्केवारी कमी असल्याने ती वाढवण्यावर सर्वच प्रशासन भर देत आहे.


मराठवाड्यातील लसीकरणाची आकडेवारी


औंरगाबाद- पहिला डोस 77 टक्के,  दुसरा डोस 38 टक्के 
परभणी- पहिला डोस 77.52 टक्के, दुसरा डोस 50.18 टक्के
नांदेड- पहिला डोस 80 टक्के, दुसरा डोस 45 टक्के
जालना- पहिला डोस 78 टक्के, दुसरा डोस टक्के


एकूणच राज्यातील कोरोनाचा वाढता आलेख पाहता निर्बंध लागू केले आहेत. मात्र निवडणुका पार पडतायत, नेते, कार्यकर्ते जल्लोष करत आहेत, अनेक कार्यक्रम घेतले जात आहेत. यामध्ये ना कुणी मास्क वापरतं, ना सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केला जातोय. लसीकरण करण्यासही नागरिक पुढे येत नसल्याने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखायचा कसा हा प्रश्नच आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha