मुंबई :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (High Court) नव्यानं हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका विकासकानं दाखल केलेल्या अर्जामध्ये परमबीर यांनी त्यांच्या (विकासकाच्या) विरोधात एफआयआर दाखल करण्यात येऊ नये, यासाठी 200 कोटींची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


अर्जदार कार्तिक भट यानं विकासक दिपक निकाळजेसोबत चेंबूर येथील एका झोपडपट्टी पुनर्वसन गृहनिर्माण प्रकल्प सुरू केल्याचं सांगत साडे तीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष मिठबावकर यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात भट विरोधात साल 2020 मध्ये एफआयआर दाखल केली होती. एफआयआरप्रमाणे तपास न करण्यासाठी चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून आपल्याकडे 200 कोटी रुपयांची लाच मागितली होती. तसेच सदर गृहनिर्माण प्रकल्पाच्या 425 कोटींच्या उत्पन्नातील 10 टक्क्यांचीही मागणी केल्याचा आरोप या अर्जातून करण्यात आला आहे.


साल 2018 मध्ये याच गृहनिर्माण प्रकल्पासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांनी परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरूनच आपल्याकडे खंडणी मागितली असल्याचा आरोपही या अर्जातून भट यांनी केला आहे. तसेच परमबीर सिंह यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा आणि पराग मणेरे यांच्यासमवेत अनेक व्यावसायिकांकडून अशाच प्रकारे खंडणी गोळा केली आहे. तसेच, अशाच प्रकारे तपासात प्रभाव टाकून त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही भट यांनी या हस्तक्षेप अर्जातून केला आहे.


गुरूवारी या अर्जावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर वेळेअभावी सुनावणी पार पडू न शकल्यामुळे 14 जून रोजी ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.  


संबंधित बातम्या :


परमबीर सिंहांना दिलेला दिलासा 15 जूनपर्यंत कायम! 'तूर्तास ॲट्रॉसिटी प्रकरणात अटक करणार नाही' : राज्य सरकार


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, एकूण 33 अधिकाऱ्यांविरोधात FIR दाखल


Anil Deshmukh : अनिल देशमुखांविरोधातील 'त्या' एफआयआरमधील काही भाग वगळण्यासाठी राज्य सरकारची हायकोर्टात याचिका