औरंगाबाद : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बॅनर लावले आहेत. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं  स्वप्न मनसे पूर्ण करणार, असे बॅनर शहराच्या चौकाचौकात लावलेले दिसत आहेत. औरंगाबादमध्ये शिवसेनेची पहिली शाखा ज्या गुलमंडीवर स्थापन झाली तिथे हे बॅनर लावून शिवसेनेला पुन्हा एकदा औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा प्रलंबित प्रश्न पुन्हा उपस्थित करण्यात आला.


छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती आहे. या निमित्ताने मनसेने बॅनर लावून शुभेच्छा तर दिल्या आहेतच पण त्याच वेळी शिवसेनेला डिवचण्याचं कामही केलं आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचं काम मनसे करेल, अशाप्रकारचा मजकूर बॅनरवर लिहिला आहे. "होय! हे संभाजीनगरच.. तमाम हिंदूंचे हे स्वप्न मनसेच पूर्ण करणार. महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छ," असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. औरंगाबादमधील मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी हे बॅनर लावलं आहे. त्यामुळे औरंगाबादचं नामांतर आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा मनसे पुढे घेऊन जात असल्याचं दिसत आहे. 


Aurangabad : औरंगाबाद की संभाजीनगर? या शहराचं नाव आलं कुठून?


औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हे शिवसेनेचे स्वप्न आहे. गेल्या पंचवीस वर्षात शिवसेना संभाजीनगरचा मुद्दा अस्मितेचा केला आहे. औरंगाबाद की संभाजीनगर यावरुन गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबादचं राजकारण केंद्रीत आहे. सत्तेत आल्यानंतर औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणार असं आश्वासन शिवसेनेच्या वतीने देण्यात आलं होतं. परंतु या नामांतराला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मात्र विरोध आहे.


औरंगाबाद शहराच्या नावाचा इतिहास काय?
औरंगाबाद या शहराचं नावाजलेलं नाव म्हणजे खडकी, हा परिसर बेसाल्ट खडकावर वसलेला आहे त्यात शहरात अगदी प्राचिन असे खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे, याच नावावरुन या शहराचे नाव खडकी पडले असावे असं इतिहासात नोंद आहे.  त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता खऱ्या अर्थाने नहरे ए अंबरी सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारुन त्याने या गावाचं शहर केलं. मात्र त्यानेही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही. कालांतराने 1633 मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्याने आपल्या नावावरुन या शहराचे नाव फतेहनगर असे ठेवले. 1653 मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला. त्याने पुन्हा या शहराचं नाव फतेहनगरवरुन खुजिस्ता बुनियाद असे ठेवले, कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आले आणि त्यानंतर या शहराला सध्याचे आहे हे औरंगाबाद हे नाव मिळालं. ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिले.