औरंगाबाद : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची माहिती पुराव्यानिशी देणाऱ्याला पाच हजार रुपयांचे बक्षीस मनसेने जाहीर केलं आहे. औरंगाबाद आणि मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवास्थानाबाहेर मनसेकडून हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात हल्लाबोल केला होता.
"घुसखोर हटाओ... देश बचाओ! पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांची अचूक माहिती पुराव्यानिशी देणाऱ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाजीनगरतर्फे रोख 5000 रुपये देण्यात येतील," असा मजकूर पोस्टरवर लिहिण्यात आला आहे.
23 जानेवारी 2020 रोजी मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी एनआरसीला पाठिंबा दर्शवत, 9 फेब्रुवारी रोजी मुंबईत पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात भव्य मोर्चा काढला. यानंतर घुसखोरांविरोधात शोधमोहीमच सुरु केली.
मनसेने पकडून दिलेले 'ते' कथित बांगलादेशी राज ठाकरेंवर खटला दाखल करणार
विरारमध्ये 23 बांगलादेशींना अटक
काही दिवसांपूर्वी मनसेने विरारमध्ये धडक कारवाई केली होती. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढल्यानंतर अर्नाळा पोलिस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली. या परिसरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या 23 बांगलादेशी महिला आणि पुरुषांना अटक केली. यामध्ये 10 महिला, 12 पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
ठाणे, बोरिवली भागात मनसेची शोधमोहीम
मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाणे, बोरिवली भागातबांगलादेशी घुसखोरांना शोधण्यास सुरुवात केली होती. ठाण्यात राहणाऱ्या तीन बांगलादेशी कुटुंबाना पकडून मनसेने पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव येथे राहणाऱ्यांकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडे ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड असल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यांच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट आढळून आल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते गद्दार : राज ठाकरे
पुण्यात मनसेची कारवाई फेल
बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेत मनसे कार्यकर्ते पुण्यातील सहकारनगरमध्ये राहणाऱ्या कुटुंबांच्या घरी पोहोचले. या सर्व कुटुंबाला बांगलादेशी ठरवून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची मोठ्या प्रमाणात माध्यमांनी दखल घेतली होती. मात्र, पोलिसांनी तपास केला असता या कुटुंबांकडे भारताचे नागरिकत्व असल्याची अनेक कागदपत्रे पुराव्याच्या स्वरुपात होते. मनसेने कारवाई केलेले तीनही कुटुंब पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचे नागरिक असल्याचं स्पष्ट झालं. या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागल्याने कुटुंबाने राज ठाकरे आणि पुणे पोलिसांविरोधात न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचं सांगितलं.
Special Report | घुसखोरांविरोधात मनसेची औरंगाबादेत पोस्टरबाजी | ABP Majha
Bangladeshi immigrants | दोन हजारात बांगलादेशी 'भारतीय' होतो; मुंबई, ठाण्यात घुसखोरांचे अड्डे | स्पेशल रिपोर्ट