Nanded News : काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील (Nanded Collector Office) गुंठेवारी विभागास आग लागून संचिका जळून खाक झाल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांनी नांदेड महापालिकेतील (Nanded Municipal Corporation) गुंठेवारी विभागात बनावट गुंठेवारी पावत्यांचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी वजिराबाद पोलिसात गुन्हा (FIR) देखील दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता या घोटाळ्याने वेगळे वळण घेतले असून, नांदेडच्या बोगस गुंठेवारी प्रकरणात 'ईडी'ची (ED) एन्ट्री झाली आहे. तर थेट ईडीची एन्ट्री झाल्याने महापालिकेतील अधिकारी आणि गुंठेवारी विभागातील संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे सोमवार 16 जानेवारी रोजी सक्तवसुली संचालनालय (ईडी) च्या पथकाने महापालिकेतील आयुक्त आणि वजिराबाद पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आहे.


नांदेड महानगरपालिकेतील गुंठेवारी विभागात अनेक गैरप्रकार घडले असून, अधिकाऱ्यांच्या बोगस सह्या करुन खोट्या जावक क्रमांकाच्या आधारे काही मालमत्ता धारकांनी गुंठेवारीचे प्रमाणपत्र मिळवले होते. या प्रकरणाची नोंद वजिराबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. आता वजिराबाद पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असतानाच ईडी कार्यालयाकडून एक पथक नांदेडमध्ये धडकले आहे. त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने आणि वजिराबाद पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्याशी चर्चा केली आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतल्याने लवकरच हा प्रकार ईडी तपासणीच्या दफ्तरात जातो की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


अनेकांचे धाबे दणाणले


या प्रकरणात अडकलेल्या अनेक अधिकाऱ्यांचे आणि गुंठेवारी संबंधित कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मनपाचे कंत्राटी उप अभियंता विजयकुमार दवणे यांनी आठ डिसेंबर रोजी गुंठेवारी प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार वजिराबाद पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरुन 15 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी जवळपास साडेसहा हजार संचिका तपासणीसाठी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. तर 15 डिसेंबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


महापालिका-पोलिसांकडून माहिती दडविण्याचा प्रयत्न 


यामध्ये पोलिसांनी अनिस फातिमा मसूद सौदागर (राहणार मदिनानगर), असदुबा मो. ईनायतुला (राहणार गणीमपुरा), शेख अहराज फरदान अब्दुल्ला रियाज (राहणार मस्तानपुरा), म. दिलशाह कलीम आणि महानगरपालिकेचा प्रभारी लिपिक व सध्या निलंबित असून फरार असलेला गंगाधर जाधव या सर्वांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खोट्या सह्या करणे, खोट्या गुंठेवारी प्रमाणपत्रावर जावक क्रमांक नोंदवणे यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हे प्रकरण ईडीकडे जाणार हे नक्की झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र या प्रकरणाची महापालिका आणि पोलीस विभागाकडून माहिती दडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप होत आहे.


संबंधित बातम्या: 


Nanded: नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील गुंठेवारी विभागाला आग, महत्वाच्या संचिका जळून खाक