औरंगाबाद : कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. कोणाचं आई-वडिलांचं मायेचं छत्र हरवलं तर कोणी आपली लाडकी मुलं गमावली तर कोणी मित्र. अशी कहाणी आहे औरंगाबादमधल्या एका तरुणीच्या प्रेमाची. कोरोनाने आपला मित्र हिरावला यावर तिला विश्वासच बसत नाही. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून ती रोज रुग्णालयासमोर जाऊन बसते आणि आपला मित्र कोरोनातून बरा होऊन भेटायला येईल याची वाट पाहते
ही कहाणी आहे निखळ मैत्रीची म्हटलं तर सच्च्या प्रेमाची. औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयाबाहेर फेऱ्या मारणारी तरुणी आहे आकांक्षा (नाव बदललेलं आहे). दोन महिन्यांपूर्वी कोविडचे उपचार घेण्यासाठी तिचा मित्र या रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मित्र आपला मित्र कोरोनाने हिरावून नेला आहे, यावर तिचा विश्वास बसत नाही आणि म्हणून ती रोज रुग्णालयाबाहेर येऊन आपल्या मित्राची वाट पाहते. हॉस्पिटलमध्ये डोक्याला हात लावून तासनतास बसलेली असते.
सिग्मा रुग्णालयाच्या समोरच्या रस्त्यावर ती तरुणी दिवसभर चकरा मारत राहते. रात्री पुन्हा इथे येऊन तीन वाजेपर्यंत समोरच्या बेडवर बसून राहते. आपला मित्र बरा होईल आणि येऊन भेटेल, या आशेवर ती इथे येते.
या मुलीचे वडील हे दोन महिन्यापूर्वी वारले आहेत. आईच मुलीचा सांभाळ करते. मुलगी अशी का वागते हे आईला कळत नाही. आईने पोलिसात धाव घेतली, पोलिसांनी मुलीची भेट घेतली आणि दामिनी पथकाने तिचं समुपदेशन केलं. त्यानंतर निर्भला निंभोरे यांनी तिची भेट घेतली. तिच्याशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. सुरुवातीला तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती हळूहळू सांगू लागली. "वेदांत (नाव बदललेलं आहे) नावाचा माझा मित्र होता. तो एमजीएममध्ये बीएसस्सीचे शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी सिग्मा हॉस्पिटलमध्ये कोरोनाने त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून मी खूप तणावात आहे. जवळचा मित्र गेल्याने कोणत्याच कामात माझं मन लागत नाही. माझी मानसिक स्थिती ठीक राहिलेली नाही. तो सिग्मा हॉस्पिटलच्या दारातच मला भेटेल, असे मला नेहमी वाटते," असं तिने सांगितलं.
आपलं ज्याच्यावर निखळ प्रेम असतं, ज्या व्यक्तीचा आपल्याला मानसिक आणि भावनिक आधार असतो ती व्यक्ती सोडून गेली तर मानसिक धक्का बसल्याने लोक असं करतात. त्या व्यक्तीला मानसिक आधार देण्याची गरज असल्याचं मानसोपचार तज्ज्ञ किशोर सिसोदे सांगतात.
कोरोना काळात आईची नोकरी गेली आहे. आई आता हताश आहे. घरी कमावते कोणी नसल्याने आकांक्षाच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे दामिनी पथकाच्या पोलीस नाईक निर्मला निंभोरे यांनी त्यांना कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिलं आहे. पोलिसांनी रोजगाराचे आश्वासन दिल्यानंतर तिच्या आईने त्यांचे आभार मानले.
कोरोनाने या मुलीचा सच्चा मित्र, तिचं प्रेम हिरावून नेलं. ते परत पुन्हा मिळणार नाही. पण या धक्क्यातून ती बाहेर पडो अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.