Jalna Crime News: चार दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये गर्भपाताची घटना (Aurangabad Abortion Case) समोर आली असतानाच, आता जालना जिल्ह्यात (Jalna District) देखील असाच काही प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील एका विवाहितेचा अवैध गर्भपात (Illegal Abortion) करण्यात आला आहे. खाजगी रुग्णालयाच्या सतर्कतेने हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. ज्यानंतर पोलिसांकडून पती, डॉक्टरांसह अन्य दोघांवर अवैध गर्भपातप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. मनोहर जाधव असे गर्भपात करणाऱ्या डॉक्टराचे नाव आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमठाणा येथील एक विवाहित महिला काकड हॉस्पिटलमध्ये चिंताजनक परीस्थित आली होती. मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव होत असल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेची सोनोग्राफी केली. त्यावेळी महिलेचा गर्भपात करण्यात आला असून गर्भाचे काही भाग गर्भपिशवीतच अडकल्याचे समोर आले. त्यामुळे संबधित डॉक्टरांनी याबाबतची माहिती शासकीय आरोग्य यंत्रणांना दिली. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने शासकीय डॉक्टरांच्या परवानगीने तत्काळ महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली.  त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. 


एका महिलेचा गर्भपात करण्यात आल्याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रकरणाची चौकशी सुरु केली. ज्यात अखेर बदनापूर तालुक्यातील एक डॉक्टर, डॉक्टरचा मित्र व गर्भपात करणारा डॉक्टर अशा चार आरोपींच्याविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात अवैध गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गर्भपात कुठे करण्यात आला, यात आणखी किती लोकांचा सहभाग आहे. अशा अनेक गोष्टींचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. 


औरंगाबादनंतर जालन्यात गर्भपात...


औरंगाबादच्या चित्तेगाव येथे एका महिलेचा अवैध गर्भपात करण्यात आल्याची घटना 5 जानेवारीला समोर आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी डॉ.अमोल जाधव आणि डॉ. सोनाली उद्धव काळकुंबे-जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना घडून दोन दिवस उलटत नाही तो आता जालन्यात देखील गर्भपाताची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात अवैध गर्भपात करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटनेतील डॉक्टर आरोपींकडे गर्भपात करण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे समोर एकले आहे. तर औरंगाबादच्या घटनेतील आरोपी डॉ. अमोल जाधवकडे डॉक्टरकीचा परवानाच नसल्याचे समोर आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


औरंगाबाद गर्भपात प्रकरणात मोठा खुलासा; आरोपी दांपत्याकडे डॉक्टरकीचा परवानाच नाही?