औरंगाबाद : औरंगाबादमध्ये लसीकरणासाठी तोबा गर्दी झाली आहे. सिडको, एन आठ इथल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या महापालिकेच्या रुग्णालयात लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी उसळली आहे. आजच्या दिवशी केवळ दीडशे नागरिकांनाच लस देण्याचे नियोजन असताना पाचशेहून अधिक लोकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये लसीचा पुरवठा झालेला नव्हता. बुधवारी (5 मे) काही लसीचे डोस औरंगाबादमध्ये दाखल आहेत आणि आज शहरात लसीकरण सुरु झालं आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. अगदी सकाळी सहा वाजल्यापासून लोक रांगेत उभे आहेत.
या केंद्रावर सकाळी सव्वा दहा ते दुपारी चार दरम्यान लसीकरण होतं. रोजच्या रोज याठिकाणी जेवढे उपलब्ध डोस असतील, त्या प्रमाणात टोकन दिले जातात. टोकन घेण्यासाठी लोकांना सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभे राहायला सांगतात. साडेनऊ वाजल्यानंतर टोकन वाटप केले जाते. लसीकरण सुरु होण्यापूर्वीच लोकांना तीन तास उन्हात उभं राहावं लागतं. रांगेत साधारणत: 400 ते 500 लोक रांगेत उभे आहेत. मर्यादित डोस असल्याने त्यांना पाच तास रांगेत उभे राहिल्यानंतरही माघारी परतावे लागत आहे.
या ठिकाणी फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण होत आहे. इतका वेळ थांबूनही त्यांना उभे राहायला ना मंडप आहे, ना पिण्यासाठी पाणी आहे. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन होताना दिसत नाही. नागरिकांनी लसीकरण, टोकन आणि सोयीसुविधेबाबत विचारणा केली असता, या ठिकाणी असलेले आरोग्य अधिकारी लसीकरण केंद्रच बंद करत करेन, अशी धमकी देत आहेत.