औरंगाबाद : औरंगाबादमधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद झाली आहे. कामगार उपायुक्त कार्यालयात जमलेल्या गर्दीचं कर्तव्य म्हणून चित्रीकरण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला इम्तियाज जलील यांनी फटका मारला.
लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने एका दुकानावर कारवाई करण्यात आली होती. या दुकानाचं सील काढण्यासाठी खासदार इम्तियाज जलील हे व्यापाऱ्यांसोबत कामगार उपायुक्तांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी कामगार उपायुक्त कार्यालयातील जमलेल्या जमावाचं कर्तव्य म्हणून चित्रीकरण करणार्या महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल खाली पाडण्यासाठी इम्तियाज जलील यांनी त्यांच्या हातावर फटका मारला. महिला कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.
लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून औरंगाबादमधील अनेक दुकानं सील करण्यात आली आहेत. शिवाय या दुकानांना दंडही ठोठावण्यात आला आहे. परंतु छोट्या व्यापाऱ्यांना हा दंड व्यापाऱ्यांना भरणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना आपली दुकानं सुरु करता येत नाहीत. याच कारणामुळे इम्तियाज जालील कामगार कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांना जाब विचारला.
कार्यालयात जमलेल्या गर्दीचं चित्रीकरण महिला पोलीस कर्मचारी करताना इम्तियाज जलील चांगलेच संतापले. "मनोरंजनासाठी चित्रपट पाहायला आलेलो नाही, जमत नसेल तर बाहेर उभे राहा," अशा शब्दात जलील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सुनावलं आणि कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारला. त्यानंतर इम्तियाज जलील यांच्यासह इतर 24 दुकानदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. इम्तियाज जलील आणि 24 व्यापाऱ्यांविरोधात आयपीसीच्या कलम 353, 332, 188, 269 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.