Aurangabad Sugarcane: राज्यात ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर ऊसाची लागवड केली. यावर्षी ऊसाचे विक्रमी उत्पन्न झाले. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला असतानाही शेतकऱ्यांच्या ऊस शेतात उभा आहे. यातच औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील चांगतपूरी गावातील संपूर्ण ऊस कारखान्यात गेल्याने गावकऱ्यांनी थेट डीजे लावून आनंद उत्सव साजरा केला. तर याचवेळी ज्या ऊसतोडणी यंत्राने ऊस तोडला त्याची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. 


जायकवाडीचा उजवा कालवाच्या जवळ असलेल्या चांगतपुरी, आपेगाव सर्कलमध्ये मुबलक पाणी आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्रही अधिक आहे. मात्र यावर्षी ऊसाची अतिरिक्त लागवड झाल्याने तोडणीसाठी मजूर मिळत नव्हते. पण चांगतपुरी येथील हर्षल उर्फ मुन्ना बाबर आणि शिवाजी गीते यांनी ऊस तोडणी यंत्राच्या सहाय्याने ( हार्वेस्टर ) एकाच हंगामात पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा तब्बल 61 हजार टन ऊस तीन कारखान्यांना घातला. चांगतपुरी गावातील सर्वच शेतकऱ्यांच्या ऊस यामुळे कारखान्यात गेला. त्यामुळे गावकऱ्यांनी थेट डीजे लावून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी अनेकांनी डीजे तालावर नाचत ठेका धरला. तसेच गावातील ऊस कारखान्यात घालणाऱ्या तोडणी यंत्राची जंगी मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. 


जोरदार आतिषबाजी... 


चांगतपुरी गावातील शेतकऱ्यांनी शनिवारी रात्री जोरदार मिरवणूक काढली. यावेळी डीजेसोबतच जोरदार आतिषबाजी सुद्धा करण्यात आली. फटकेबाजी करत शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला. तर गावकऱ्यांनी डोक्याला फेटे बांधत शिवाजी गीते यांच्या तोडणी यंत्राची जंगी मिरवणूक काढली. यावेळी गावात मोठ्या उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. 


मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात किती गाळप... 


औरंगाबाद जिल्ह्यातील 7 कारखान्यांनी 28 लाख 55  हजार 244  टन उसाचे गाळप करून 29 लाख 80 हजार 710 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील 5 कारखान्यांनी 28  लाख 28 हजार 355 टन उसाचे गाळप करून 29 लाख 77 हजार 400 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील 7 कारखान्यांनी 46 लाख 84 हजार 893 टन उसाचे गाळप करून 40 लाख 65 हजार 370 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. परभणी जिल्ह्यातील 6 कारखान्यांनी 43  लाख 43 हजार 177 टन गाळप करून 42 लाख 10 हजार 295 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हिंगोली जिल्ह्यातील 5 कारखान्यांनी 21 लाख 48 हजार 8 टन उसाचे गाळप करून 20  लाख 50 हजार 31 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. तर मराठवाड्यात अजूनही 2 लाख 80 हजार टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे.