औरंगाबाद : मोठ्या बहिणीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांची धाकट्या बहिणीने यथेच्छ धुलाई केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. तिने एका टवाळखोराला चांगलंच चोपलं. तिचं रौद्र रुप पाहून घाबरलेला दुसरा टवाळखोर दुचाकी तिथेच सोडून पळून गेला. औरंगाबाद शहरातील सूतगिरणी चौकात काल (25 जून) दुपार तीनच्या सुमारास ही घटना घडली. 


दोन टवाळखोरांनी एका तरुणीला रोखलं आणि तिची छेड काढू लागले. त्याबद्दल त्यांना तरुणी जाब विचारत असतानाच तिची धाकटी बहीण तिथे दाखल झाली आणि तिने काही क्षणातच त्यातील एका टवाळखोराला चोप देण्यास सुरुवात केली. पंधरा मिनिटे तिने टवाळखोराला धू-धू धुतलं, अक्षरश: झोडपून काढलं. तिचा रुद्रावतार पाहून एका टवाळखोराने दुचाकी तिथेच सोडून पोबारा केला.


23 वर्षीय विवाहित बहीण रेणू (नाव बदललेलं आहे) लहान भावासोबत औरंगपुरा परिसरात गेली होती. तिथून भावाचा गारखेडा परिसरात क्लास असल्याने तिकडे सोडवण्यासाठी ती औरंगपुऱ्यातून गारखेडाकडे निघाली. मात्र, औरंगपुऱ्यातून तिच्या मागे दोन दुचाकीस्वार मागे लागले. हा प्रकार रेणूला कळाला मात्र तिने दुर्लक्ष केले. परंतु दर्गा रस्त्यापर्यंत त्यांनी पाठलाग सुरु केला. त्यामुळे त्यांची हिंमत वाढली त्यांनी अश्लील हातवारे करणे, अश्लील शब्द वापरणे सुरु केले. रेणूने तोपर्यंत एका ठिकाणी थांबून बहिणीला हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर ती चौकात पोहोचली. गाडीवरुन उतरली आणि तिने यातून टवळाखोरांची धुलाई करायला सुरुवात केली. तिने पंधरा-वीस मिनिटं टवाळखोरांना धू-धू धुतलं. तिचा रुद्रावतार पाहून त्यातला एक टवाळखोरांना आपली मोटारसायकल सोडून पळ काढला. 


काही काळात लोक जमायला लागली आणि हे पाहून दुसरा टवाळखोर देखील तेथून पळून गेला. हा सगळा प्रकार सुरु असताना तिथे बरेच लोक जमा झाले पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाहीत. हातात असलेल्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात हा प्रकार रेकॉर्ड करण्यात ते व्यस्त होते. त्यामुळे ही बाब निश्चितच खेदजनक होती. पण ज्या मुली या टवाळखोरांच्या छेडछाडीला दुर्लक्ष करतात, त्याच्यासाठी ही तरुणी आदर्श आहे.