Maharashtra Elections 2022 : राज्यातील 92 नगर परिषद आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुकींचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, कन्नड, खुलताबाद आणि गंगापूर नगरपालिकांचे सुद्धा समावेश आहे. त्यामुळे आता निवडणुकीत बाजी मारण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहे. तर अनेक महत्वाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. राज्यात सुरु असेल्या सत्तांतराचा गोंधळ पाहता सर्वच पक्षांसाठी या निवडणुका आता महत्वाच्या ठरणार आहे.
अशी असणार प्रभाग रचना...
अ.क्र. | नगरपरिषद | प्रभाग संख्या | सदस्य संख्या | मतदार |
1 | कन्नड | 12 | 25 | 35 हजार 353 |
2 | पैठण | 12 | 25 | 35 हजार 395 |
3 | खुलताबाद | 10 | 20 | 13 हजार 530 |
4 | गंगापूर | 10 | 20 | 26 हजार 358 |
कोण मारणार बाजी...
पैठण नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना, आमदार भुमरे गट, भाजप, आणि राष्ट्रवादी रिंगणात असणार आहे. तर काँग्रेस सुद्धा काही उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे. त्यात थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाची घोषणा झाल्यास निवडणुकीत आणखी चुरस वाढण्याची शक्यता आहे. कन्नड नगरपरिषदेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सद्यातरी वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. पण ऐनवेळी वरती युती झाल्यास चित्र वेगळे असेल. भाजप आणि शिवसेना यांना उमेदवार कोणता द्यायचा इथपासून तयारी सुरु करावी लागणार आहे. त्यात आमदार उदयसिंह राजपूत यांच्यासाठी नगरपरिषद आपल्या ताब्यात आणण्याचे आव्हान असणार आहे.
गंगापूरमध्ये माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी काँग्रेसचा हात सोडून घड्याळ हातात बांधल्याने राष्ट्रवादीचं वजन वाढले आहे. त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती वाईट आहे. त्यात आमदार प्रशांत बंब पूर्ण ताकदीने रिंगणात उतरून नगरपरिषद आपल्या ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर शिवसेना सुद्धा आपले उमेदवार उतरवणार आहे. त्यात एमआयएम सुद्धा काही प्रभागात उमेदवार देऊ शकते. खुलताबाद नगरपरिषद आमदार बंब यांच्या मतदारसंघात असल्याने त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय असणार आहे. त्यात भाजप-शिंदे गट एकत्र आल्याने अब्दुल सत्तार यांची साथ मिळाल्यास याचा आणखी फायदा भाजपला होईल. तर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली रिंगणात असणार आहे. तर ऐनवेळी राष्ट्रवादी-काँग्रेसची युती होऊ शकते.