Aurangabad News: राज्यात नुकत्याच 7 हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका (Gram Panchayat Elections) पार पडल्या. यावेळी काही ठिकाणी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोपही झाला. मात्र पैसे वाटप करूनही मतदारांनी मतदान (Voting) केले नसल्याचा आरोप करत, चक्क मतदाराला मंदिरात नेऊन देवाच्या डोक्यावर हात ठेवून आम्हालाच मतदान केल्याच कबुल करून घेतल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. विशेष म्हणजे या सर्व घटनेचा कथित व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, कन्नड तालुक्यातील पिशोर येथून जवळच भारंबा व भारंबावाडी ही गावे आहेत. येथे नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. आता याच गावातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक वृद्ध मतदार व सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराचा पती एकमेकांना बोलताना दिसत आहेत. तुम्ही पैसे घेऊनही आम्हाला मतदान केले नाही, असा आरोप त्या उमेदवाराच्या पतीने मतदारावर केला. तेव्हा आम्ही तुम्हालाच मतदान केल्याचा दावा मतदाराने केला व आम्ही तुमच्या घरी आलो होतो का, असा प्रतिप्रश्न केला. 


विषय इथेच संपला नाही तर, उमेदवाराच्या पतीने पैसे मतदानासाठी दिले होते, बाजारासाठी नव्हे, असे उत्तर वृद्ध मतदाराला दिले. तेव्हा मतदाराने तुम्हाला हे सगळं शोभत नाही, असे म्हणत फटकारले. तेव्हा उमेदवाराच्या पतीने शहाणी सुरती माणसं पैसे घेऊन मतदान करीत नाहीत असे म्हणून त्रागा केला व देवाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा असे म्हटले. तेव्हा मतदार देवाच्या डोक्यावर हात ठेवत मी तुम्हालाच मतदान केल्याचे सांगतो. यानंतर विषय संपला असे म्हणत दोघेही घरी जातात असे व्हिडिओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तालुक्यात याची सगळीकडे चर्चा होत आहे.


कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 


औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील भारंबावाडी येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी मतदारांना पैसे वाटप केले. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर 'तुम्ही मला मतदान केले नाही, त्यामुळे पैसे परत द्या, नाहीतर मंदिरात जाऊन देवाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा' असे म्हणत मतदाराला वेठीस धरल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एकूण तीन व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात पराभूत महिला उमेदवार आणि तिचा पती गावात लोकांच्या भेटी घेऊन तुम्ही पैसे घेऊन आम्हाला मतदान केले नसल्याचे सांगून, वाद घालतांना पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad: औरंगाबादच्या आपेगावात पुन्हा बिबट्याची दहशत; गेल्यावर्षी घेतला होता पिता-पुत्राचा जीव