Aurangabad Water Issues : औरंगाबाद शहरात निर्माण झालेली पाणीटंचाई आणि लोकांमधील नाराजी पाहता ठाकरे सरकारने पाणीपट्टी 4 हजार 50 वरून अर्धी करत 2 हजार 25 केली होती. मात्र त्याची प्रत्यक्षात अमलबजावणी होतांना दिसत नव्हती. पण ठाकरे सरकार कोसळताच या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याचे पत्र काढण्यात आले असून, सोमवारपासून औरंगाबादकरांना पाणीपट्टीसाठी आता 2 हजार 25 रुपये भरावे लागणार आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

असे आहेत पाणीपट्टी दर.... 

  जोडणीचा आकार  प्रचलित दर  50 टक्के दर 
1 अर्धा इंच   4,050 2,025
2 पाऊण इंच 6,400 3,200
3 एक इंच 14,900 7,450
4 दीड इंच 65,250 32,625
5 दोन इंच 1,08,700 54,350
6 चार इंच 2,60,900 1,30,450
7 सहा इंच 4,34,850 2,17,425
8 आठ इंच 6,52,300 3,26,150

जाता-जाता घेतला निर्णय...

सर्वाधिक पाणीपट्टी भरून सुद्धा औरंगाबाद शहरात सात-आठ दिवसांनी पाणी येत असल्याने औरंगाबादच्या नागरिकांमध्ये मोठा संताप होता. त्यामुळे तत्कालीन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणीपट्टी अर्धी करून 2 हजार 25 केली होती. दरम्यान सरकार कोसळले, त्यात महानगरपालिका आयुक्त यांच्या बदलीचे आदेश सुद्धा निघाले. पण आयुक्तांनी बदलीचे आदेश निघण्यापूर्वीच पाणीपट्टीचा ठराव मंजूर केला. त्यामुळे आता सोमवारपासून औरंगाबादकरांना पाणीपट्टीत मोठा दिलासा मिळाला आहे.