Aurangabad Crime News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा पार पडली. त्यांनतर नितेश राणे यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पैसे देतानाचा एका फोटो पोस्ट केला होता. हा फोटो आणि राणेंची पोस्ट अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. त्यामुळे यावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सेनेच्या सभेबाबत चुकीची पोस्ट व्हायरल करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे.


शिवसैनिकांनी वाळूज पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांची सभा 8 तारखेला औरंगाबाद शहरात पार पडली आहे. मात्र या सभेला चंद्रकांत खैरे यांनी लोकांना पैसे देऊन बोलावल्याची चुकीची पोस्ट नितेश राणे यांनी केली आहे. त्यांनतर सोशल मिडीयावर हा फोटो आणि पोस्ट काही लोकांकडून व्हायरल केली जात आहे. पोस्ट टाकणारे आणि व्हायरल करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. त्यामुळे पोलीस आता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


सायबर पोलीस करू शकतात गुन्हा दाखल... 


जेव्हा-जेव्हा कुठे राजकीय नेत्यांची मोठी सभा किंवा मोर्चे असतात, अशा ठिकाणी सायबर पोलीस विशेष लक्ष ठेवतात. सोशल मीडियावर पडणाऱ्या प्रत्येक पोस्टवर त्यांचे लक्ष असते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सभेच्या अनुषंगाने व्हायरल होत असलेला जुन्या फोटोबाबत सायबर पोलिसांकडून सुद्धा गुन्हा दाखल केली जाण्याची शक्यता आहे. 


खैरेंच उत्तर... 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेचा उल्लेख करत नितेश राणे यांनी एका ट्विटद्वारे शिवसेनेवर निशाणा साधलाय. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे पैसे वाटतानाचा फोटो नितेश राणेंनी ट्विट केलाय. शिवाय हाच का विराट सभेचा फॉर्म्युला? असा सवाल नितेश राणेंनी या ट्विटमध्ये केलाय. त्याला उत्तर देताना खैरे म्हणाले, नितेश राणे यांच्या वडिलांसोबत मी काम केलं आहे. जुने फोटो व्हायरल करून बदनाम केले जात आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर खटला दाखल करणार आहे.