Aurangabad Paithan Road: राजकारणात आपली वेगळी छाप पाडणारे आणि सरळ थेट स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहणारे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या महिन्यात भूमिपूजन केलेल्या औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण रद्द करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या रस्त्याचे तीनदा भूमिपूजन झाले असून, गडकरी यांनी दोनदा भूमिपूजन केले आहे. मात्र असे असताना अचानकपणे या रस्त्याचे चौपदरीकरण रद्द करून दुपदरी करण्याचा निर्णय एनएचएआय यांनी घेतला आहे. त्यामुळे गडकरींबद्दल औरंगाबादकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. 


औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी गेल्या 15 वर्षांपासून सुरु आहे. प्रत्येक निवडणुकीत पैठण मतदारसंघात औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरणाचा मुद्दा आघाडीवर असतो. त्यामुळे 2012 मध्ये हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना या रस्त्याचे चौपदरीकरणासाठी भूमिपूजन करण्यात आले होते. त्यांनतर पुन्हा एकदा 2016 मध्ये नितीन गडकरी यांनी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची घोषणा करत भूमिपूजन केलं. मात्र त्यानंतर सुद्धा पुढे काही हालचाली झाली नाहीत. त्यांनतर पुन्हा 24 एप्रिल 2022 रोजी गडकरी यांनी याच रस्त्याचे चौपदरीकरणासाठी भूमिपूजन केलं. मात्र महिन्याभरातच अचानकपणे या रस्त्याचे चौपदरीकरण रद्द करून दुपदरी करण्याचा निर्णय एनएचएआय यांनी घेतला आहे.   


यामुळे चौपदरीकरण रद्द... 


24 एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रमात औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरणाचे भूमिपूजन करताना गडकरी यांनी औरंगाबाद-पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या नवीन महामार्गामुळे औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील वाहतूक कमी होईल असा दावा एनएचएआयचा काही अधिकाऱ्यांचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी औरंगाबाद-पैठण रस्त्याचे चौपदरीकरणाची घोषणा होताच एनएचएआयचा काही अधिकाऱ्यांनी या रस्त्यावर जमिनी घेऊन, त्या ठिकाणी बायपास वळवला असल्याचा आरोप झाला होता. या सर्व घडामोडी पाहता औरंगाबादकरांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. 


पुढील आठवड्यात बैठक...


औरंगाबादला-पैठण रस्त्याप्रकरणी पुढच्या आठवड्यात दिल्लीत एक महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याच बैठकीत रस्त्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. तर या सर्व घडामोडींवर बोलताना प्रकल्प संचालक अरविंद काळे म्हणाले की, औरंगाबाद-पैठण रस्ता रुंदीकरणाबाबत पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे, याबाबत मला माहित नाही असं म्हटल आहे.