Maharashtra Political Crisis: गेल्या पंचवीस दिवसांपासून शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील राजकीय युद्ध आणखीनही सुरूच आहे. दोन्ही बाजूने आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आमदार संदिपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्री झाल्यावर सामना कार्यालयात येऊन माझ्यापुढे लोटांगण घालायचे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. 


राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मतदारसंघात आलेल्या भुमरे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला उत्तर देतांना संजय राऊत भुमरेंवर पुन्हा एकदा बरसल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, संदिपान भुमरे जेव्हा मंत्री झाले तेव्हा सामना कार्यालयात येऊन प्रमाने माझ्यासमोर त्यांनी लोटांगण घातलं. तुम्ही होता म्हणून हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो असे मला म्हणाले. वाटल्यास त्याचे व्हिडिओ फुटेज असेल तर काढायला लावतो मी, सगळं आहे, असं राऊत म्हणाले. 


Aurangabad: महिला आमदारांना संजय राऊत वेश्या म्हणाले; संदिपान भुमरेंचा गंभीर आरोप


बंडखोरांची कार्यशाळा भरवा...


यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले की,  जे काही लोकं गेले आहेत त्यांनी बंडखोरीचा निर्णय का घेतला यासाठी त्यांची कार्यशाळा घेतली पाहिजे. आजही ते आमचेच आहेत. आम्ही एका नात्याने बांधले गेलेलो आहेत. पण का गेलो हे नक्की ठरवा, गोंधळून जाऊ नका. आदित्य ठाकरे असतील किंवा पक्षातील इतर नेत्यांमुळे आम्ही पक्ष सोडला, निधी मिळाला नाही म्हणून पक्ष सोडला म्हणतात. पण नक्की पक्ष कशामुळे सोडला यासाठी त्यांची एक कार्यशाळा घेतली पाहिजे आणि नक्की कारण कोणतं यावर त्यांनी एकमत केलं पाहिजे असेही राऊत म्हणाले. 


आमचं मन साफ आहे...


पुढे बोलतांना राऊत म्हणाले, त्यांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या, पण आमचं मन साफ आणि स्वच्छ आहे. कुणावर काहीही भन्नाट आरोप करायचे, काय तर म्हणे शरद पवार यांच्यामुळे शिवसेना संपत आहे. पण पवारांच्या पक्षातूनच ही लोकं आमच्याकडे आली आहे. त्यामुळे जाणाऱ्या लोकांमुळे शिवसेनेला कोणताही फरक पडला नसल्याचं राऊत म्हणाले.