Aurangabad Flood: राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यावर्षी सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांच्या दृष्टीने प्रशासनाकडून आढावा घेतला जात आहे. औरंगाबादमध्ये प्रशासनाकडून जिल्ह्यामध्ये पावसाच्या पाण्यामुळे धोका संभवणाऱ्या गावांची वर्गवारी करण्यात आली आहे. ज्यात 165 गावांना पुराचा धोका असून, नदीकाठचे 43 गाव निळ्या रेषेखाली या वर्गवारीत ठेवण्यात आले आहे.


अशी आहे वर्गवारी...


ज्या गावांमध्ये गेल्या 50 वर्षांत पुराचा धोका संभवला आहे अशा गावांना पूरप्रवण वर्गवारीमध्ये, तर ज्या गावांना नेहमीच पुराचा वेढा पडतो अशा यादीमधील नदीकाठी असलेली 43 गावे हे निळ्या रेषेखाली या वर्गवारीमध्ये टाकण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील निर्माण होणारी पूर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाकडे जिल्ह्यात दहा बोटी, 307 लाइफ जॅकेट 162 लाइफबॉय असल्याची माहिती जिल्हा आपत व्यवस्थापन विभागाने दिली.


कोणत्या वर्गवारीत किती गावे... 


जिल्ह्यात सर्वाधिक 48 पूरप्रवण गावे ही कन्नड तालुक्यातील आहेत. तर औरंगाबाद तालुक्यात 16, पैठण 15, फुलंब्री 7, वैजापूर 31, गंगापूर 26, खुलताबाद 6, सिल्लोड 10 व सोयगाव तालुक्यातील 6 अशा एकूण 165 गावांमध्ये गेल्या 50 वर्षांत पुराचा धोका संभवला आहे.


सोबतच जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील 42 गावे निळ्या रेषेखाली येतात. यामध्ये पैठण तालुक्यातील 18, वैजापूर 17 व गंगापूर तालुक्यातील 8 गावांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पैठण शहर, कावसान, दादेगाव- जहांगीर, नायगाव, वडवाळी व नवगाव, तसेच वैजापूर तालुक्यातील डोणगाव, बाबतारा, लाखगंगा, नांदूर ढोक, बाभूळगाव, बाजारठाण या गावांना पुराचा वेढा बसतो. 


ऐनवेळी पाणी सोडल्याने पूर परिस्थिती... 


पश्चिम महराष्ट्रात असलेल्या धरणातून सोडण्यात येणारे पाणी गोदावरीमार्गे जायकवाडी धरणात दाखल होते. मात्र अनेकदा वरील धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय खाली पाणी सोडले जात नाही. धरण भरल्यानंतर पावसाचे प्रमाण वाढल्यास अचानकपणे पाण्याचा वेग वाढवला जातो. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. याचा मोठा फटका गोदावरी काठावर असलेल्या गावांना बसतो. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि नियमानुसार नियोजन करून पाणी सोडण्याची मागणी दरवर्षी मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून केली जाते.