Aurangabad Latest Rain News : औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारनंतर अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागात सुद्धा पावसाने चांगली बॅटींग केली. मात्र याचवेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. ज्यात दोन पुरुष आणि महिलेचा समावेश आहे. तर काही ठिकाणी अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची धावपळ उडाल्याचे सुद्धा पाहायला मिळाले.
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात तिघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. ज्यात आडगाव जावळे येथे दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून, यावेळी सांडू शामराव नजन यांच्या घरावर वीज पडल्याने त्यांची बहीण सरुबाई शहादेव लांडे ( वय 40 वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत केकत जळगाव येथे गजानन दराडे (वय 27 वर्षे ) यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचाही मृत्यू झाला. तर सिल्लोड तालुक्यातील उटाडेवाडी येथील शेतकरी संजय उटाडे ( वय 40 वर्षे) शेतात ठिबक सिंचनचे पाइपलाइन करत असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे.
'या' भागात पावसाची हेजरी -
औरंगाबाद शहरात संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. तसेच दुपारनंतर पैठण,वैजापूर गंगापूर आणि औरंगाबाद तालुक्यात जोरदार पाऊस कोसळताना पाहायला मिळाले. त्यामुळे शेतीची पेरणीपूर्वी मशागत करून ठेवलेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला. तर आणखी एक असेच जोरदार पाऊस झाल्यास पेररणीला सुरवात होण्याची शक्यता आहे.
अनेकांचं नुकसान -
अचानक आलेल्या पावसाचा अनेकांना फटकाही बसला आहे. काही ठिकाणी आठवडी बाजार सुरू असताना अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची धावपळ उडाली.तसेच काही ठिकाणी घरे आणि झाडं पडल्याचं सुद्धा समोर येत आहे. औरंगाबाद तालुक्यातील पिंप्रीराजा चितेपिंपळगांव येथे जोरदार वादळ आणि पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. काहींच्या घरावरचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी विजेचे खांब पडले आहे.
कोणत्या तालुक्यात किती पाऊस...
औरंगाबाद जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास शहरात आणि ग्रामीण भागातील बऱ्याच ठिकाणी मृगाच्या पावसाने हजेरी लावली होती. तर आज दुसऱ्या दिवशी सुद्धा पाऊस पडत आहे. औरंगाबाद तालुक्यात आतापर्यंत 15.2 मिलिमीटर पाऊस पडला असून, पैठणमध्ये 0.9, गंगापूर 14.1, वैजापूर 12.6,कन्नड 24.2, खुलताबाद 24.8, सिल्लोड 8.9, सोयगाव 01 आणि फुलंब्रीत सुद्धा 01 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.