Aurangabad nagarpancahyat elections 2022 : राज्यभरातील 216 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, पैठण, गंगापूर आणि खुलताबाद नगरपरिषदेच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत प्रकिया पार पडली. मात्र ओबीसी आरक्षणाच्या शिवाय आरक्षण प्रकिया पार पडल्याने पैठण येथे भाजपकडून सभागृहाचा त्याग करत प्रकियेवर बहिष्कार टाकण्यात आला. 


मुदत संपलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत प्रकिया राबवण्याचे आदेश काढले होते. विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय हे आरक्षण सोडत प्रकिया राबविण्यात आली आहे. त्यामुळे अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जामाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी आज सोडत काढण्यात आली. दरम्यान पैठण येथील पंचायत समिती सभागृहात नगरपरिषद निवडणूक आरक्षण सोडत संपन्न झाली. मात्र यावेळी भाजपचे माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्यासह भाजपच्या माजी नगरसेवकांनी ओबीसी आरक्षणाच्या शिवाय आरक्षण प्रकिया पार पडल्याने सभागृहाचा त्याग करत प्रकियेवर बहिष्कार टाकला. तसेच यावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. 


जोरदार घोषणाबाजी..


आरक्षण सोडत प्रकिया सुरु असताना लोळगे यांनी सोडत प्रकियेवर बहिष्कार टाकला. यावेळी ओबीसी आरक्षण मिळालच पाहिजे, भारतीय जनता पार्टीचा विजय असो,आरक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं, अशा जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळेसाठी सभागृहात गोंधळ उडाल्याच पाहायला मिळाले.


 



महापालिकांच्या निवडणुकीच्या तारखा लवकरच


दरम्यान, राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झालं आहे. मुंबई, ठाणे, नागपूर महानगरपालिकेसह 14 महापालिकांच्या निवडणुका जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. नऊ महिन्यांपूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून राज्य निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच संभाव्य तारखांबाबत संकेत दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुकांसाठी 31 मेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार असल्याचं निश्चित केलं आहे. याचाच अर्थ या तारखेला किंवा त्यापूर्वी नोंदणी केलेल्या मतदारांना या मतदानात मतदान करण्याचा अधिकार असणार आहे.