Aurangabad News: गेल्यावर्षी कोरोना काळात 'थाली बजाव कोरोना भगाव' अशी मोठ्याप्रमाणावर चर्चा झाली होती. आता असाच काही आगळावेगळा सल्ला वनविभागाने (Forest Department) गावकऱ्यांना दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील आपेगाव येथे दोन दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याने वनविभागाने लोकांना असा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे वनविभागाने गावकऱ्यांना छोटे भोंगे आणि शिट्या देखील वाटप केल्या आहेत. 


त्याचं झालं असे की, पैठण तालुक्यातील आपेगावमध्ये मंगळवारी एका शेतकऱ्यांला शेतात बिबट्या दिसून आला. त्यामुळे त्याने त्याचा छायाचित्र देखील काढला. त्यानंतर याची माहिती तत्काळ पोलीस आणि वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळाल्यावर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गावात पोहचले. ज्या शेतात बिबट्या दिसला त्याठिकाणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर वनाधिकारी काही ठोस पाऊल उचलतील अशी अपेक्षा गावकऱ्यांना होती. मात्र आलेल्या वनाधिकारी यांनी जे केलं त्याने गावकऱ्यांना धक्काच बसला. 


पाहणीसाठी आलेल्या वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुरवातीला गावकऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने काही सूचना केल्या. मात्र त्यानंतर सोबत आणलेल्या शिट्ट्या आणि छोटे भोंगे गावकऱ्यांना वाटप केले. बिबट्यापासून सुरक्षित राहण्यासाठी शिट्या आणि भोंगे वाजवत राहण्याचा सल्ला दिला.  वनविभागाच्या या सल्ल्याने शेतकरी काहीवेळीसाठी आश्चर्यचकित झाले. तसेच समोर बिबट्या उभा राहिल्यावर शिट्टी वाजवल्याने तो पळून जाईल का? असा प्रश्नही त्यांना पडला. पण याचे उत्तर त्यांना काही मिळाले नाही. त्यामुळे गावात सद्या बिबट्यापेक्षा वनविभागाच्या 'शिट्टी बजाव, बिबट्या भगाव; याचीच अधिक चर्चा आहे. 


अधिकारी काय म्हणतात? 


याबाबत 'एबीपी माझा'च्या प्रतिनीधी यांनी या विभागाचे अधिकारी राजू जाधव याची प्रतिक्रिया जाणून घेतली. गावातील काही लोकांनी शिट्ट्या आणि पिपाण्या आणल्या होता. शिट्टी वाटप करण्याचे कारण म्हणजे आपण जोरात आवाज करत गेलो तर लपून बसलेला बिबट्या निघून जातो आणि माणसाकडे येत नाही. एखाद्यावेळी त्याला माहित नसले आणि आपणच अचानकच त्याच्या समोर गेल्यास आपण त्याला मारणार असल्याचे त्याला वाटते आणि तो हल्ला करू शकतो, असे जाधव म्हणाले.  त्यामुळे आपण फक्त बोलण्याचा देखील आवाज केला तर कोणीतरी येत असल्याचे बिबट्या लक्षात येते आणि तो सावध होऊन बाजूला निघून जातो. 


Aurangabad: औरंगाबादच्या आपेगावात पुन्हा बिबट्याची दहशत; गेल्यावर्षी घेतला होता पिता-पुत्राचा जीव