Aurangabad Crime News: औरंगाबादमधील एका कुरियर बॉयला कमी किंमतीत मोबाईल घेण्याचा मोह चांगलाच महागात पडला आहे. कारण पाच हजार रुपयांत मोबाइल देतो म्हणत टोळक्याने त्याचे तब्बल 26 हजार 600  रुपये घेऊन पळ काढला आहे. ही घटना शहरातील गजानननगर मळा परिसरात घडली आहे. दीपक सुभाष ठेंग (वय 26 वर्षे, रा. गल्ली क्र. 5 जाधववाडी) असे या फसवणूक झालेल्या कुरियर बॉयचे नाव आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दीपक हा शॅडोफॅक्स टेक्नोलॉजी प्रा. लि. कंपनीद्वारे कुरियरची कामे करतो. 7 सप्टेंबरला दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास भारतनगर येथे कुरियर देण्यासाठी जात असताना गजानननगर मळा, येथील डीपीजवळ चौघांनी दीपकला आवाज देऊन बोलावून घेतले. त्यानंतर एक मोबाइल दाखवून विक्री करायचा आहे, असे सांगितले.


पाच हजारात ठरलं, पण...


यावेळी चौघांनी दीपकला मोबाईलची 19 हजार 500  रुपये किंमत सांगितली. दीपकने एवढे पैसे नाहीत, पण पावती दाखविण्याची मागणी केली. त्यावर शिव मोबाइल शॉपी, जुने बसस्थानक, धुळे या नावाची एक पावती दाखविली. दीपकने मोबाइल व पावतीचा फोटो त्याच्या पत्नीच्या व्हाट्सअॅपवर पाठविला. तिने मोबाइल घेण्याची तयारी दाखविली. त्यानंतर आरोपींपैकी काशिनाथ मोहितेने पाच हजारांत मोबाइल देण्यास होकार दिला. 


अशी झाली फसवणूक...


मोबाईलचा पाच हजारात दर ठरल्यानंतर दीपकच्या पत्नीने दोन हजार रुपये दीपकला फोन पे केले. तेच पैसे दीपकने काशिनाथला पाठविले. पैसे खात्यावर येताच आरोपींनी दीपकजवळील 20 हजार 600 रुपये रोकड, चार हजारांचा एक मोबाइल हिसकावून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच दिपकने पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. 


महत्वाच्या बातम्या...


आता नवीन वाद! मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्याचे आदेश


Crime: 'मला आय लव्ह यू म्हण, नाहीतर गल्लीत फोटोचे बॅनर लावीन'; पोलिसात मजनूविरोधात गुन्हा दाखल