Aurangabad News: गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादच्या नामांतराची मागणी होत आहे. दरम्यान आता या मागणीला लवकरच यश येणार असून, औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाकडून (Union Ministry Of Home Affairs) लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी दिली आहे. औरंगाबादच्या जयभवानीनगर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. 


यावेळी बोलतांना भागवत कराड म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारने औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे डॉ. कराड म्हणाले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश मिळणार आहे. 


शिंदे-फडणवीस सरकराने दिली मंजुरी...


औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. यावरून सतत राजकीय पक्षात आरोप-प्रत्यारोप होतात. दरम्यान शिंदे सरकार सत्तेत आल्यावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे आता औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित असून, त्यानंतरचं जिल्ह्याचे नाव बदलले जाणार आहे. 


उद्धव ठाकरेंनी देखील घेतला होता निर्णय...


राज्यात शिंदे गटाने बंड पुकारल्यावर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आले आणि उद्धव ठाकरेंचा निर्णय अनधिकृत असल्याचे सांगत पुन्हा नव्याने निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता हा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित असून, त्यानंतरच जिल्ह्याचे नाव बदलले जाणार आहे. 


नामांतराच्या मुद्यावरून सतत राजकारण...


औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून सतत राजकारण करण्यात आल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षाकडून औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा हमखास आघाडीवर असतो. तर काही पक्षाकडून औरंगाबादच्या नामांतराला विरोध देखील केला जातो. विशेष म्हणजे याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून राजकारणाचा मुद्दा बनलेल्या औरंगाबादच्या जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय केंद्राकडून कधी घेतला जाणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे. 


Samruddhi Mahamarg: औरंगाबाद ते शिर्डी अवघ्या एका तासात, भरावे लागणार एवढा टोल