Aurangabad Crime News: औरंगाबादच्या कैसर कॉलनी भागात एक धक्कादायक घटना समोर आली असून, चोर समजून चौघांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पिठाच्या गिरणीवर काम करणाऱ्या या तरुणाला हातगाडी चोर समजून मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरु होता, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. तर मारहाण करणाऱ्या चौघांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली आहे. शेख उस्मान ऊर्फ अजिम नाजीम असे मृत तरुणाचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख उस्मान हा गिरणीवर काम करत करतो. 12 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास उस्मान हा मित्र फेरोज खान असमत खान दुर्राणी याच्यासोबत राजाबाजारकडून कैसर कॉलनीकडे जात होता. दरम्यान उस्मान हा मेडिकल दुकानात खरेदीसाठी गेला. याचवेळी अचानक तेथे आलेल्या चौघांनी उस्मानला,'तू येथे हातगाडी चोरण्यासाठी आलास का म्हणत बेदम मारहाण केली.


उपचार सुरु असतानाच मृत्यू...


चौघांनी उस्मानला चोर समजून मारहाण करायला सुरवात केली. या मारहाणीत तो बेशुद्ध पडला. हा प्रकार पाहून त्याचा मित्र फेरोज खान हा उस्मानला वाचविण्यासाठी आला असता त्याला देखील आरोपींनी मारहाण केली. तर गंभीर जखमी झालेल्या उस्मानला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना उस्मानचा मृत्यू झाला. या प्रकरणात सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


यांनी केली मारहाण... 


उस्मानच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, शेख फहीम शेख बाबू, शेख कलीम शेख बाबू ( दोघे रा. बाबर कॉलनी, कटकट गेट), मोहम्मद अथर ऊर्फ बबलू शेख अफसर (रा. अबरार कॉलनी, मिसारवाडी) आणि शेख राजेक शेख आतिक (रा. एसटी कॉलनी, फाजलपुरा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या...


औरंगाबादकरांची चिंता वाढली! चोवीस तासांत 12 डेंग्यूसदृश रुग्ण, आरोग्य विभागात खळबळ


Abdul Sattar : औरंगाबाद खंडपीठाचा अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका; नोटीसही बजावली