Lumpy Skin Disease : राज्यात दिवसेंदिवस लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin Disease) धोका वाढत आहे. राज्यातील 19 जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. दरम्यान, मराठवाड्यातील (Marathwada) 197 जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 78 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. मराठवाड्यात 53 गावांमध्ये हा संसर्ग पाहायला मिळत आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झालं आहे. 


मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्याती किती जनावरे बाधित  


औरंगाबाद - 33
 जालना - 7
 बीड - 26 
परभणी - 20 
लातूर मध्ये सर्वाधित - 102 
उस्मानाबाद - 9 जनावरे बाधित आहेत


मराठवाड्यात 66 हजार लसी उपलब्ध, 43 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण


मराठवाड्यात लम्पी स्कीन आजाराची लागण झालेली एकूण 197 जनावरे आहेत.  मराठवाड्यात 66 हजार लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.मराठवाड्यातील अडीच लाखपैकी 43 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दोन लाख जनावरांचे लसीकरण शिल्लक आहे. त्यासाठी सध्या 66 हजार लसींचा साठा आहे, परंतू आठ जिल्ह्यांतील लसीकरणासाठी 3 लाख लसींची गरज आहे.


राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव


राज्यात जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराचा धोका वाढत आहेत. त्यामुळं पशुपालक चिंतेत आहेत. राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये लम्पी रोगाचा प्रदुर्भाव झाला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून खबरदारीची पावलं उचलण्यात येत आहेत. राज्यातील जनावरांचे बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच राज्यात आणि परराज्यात जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. तर पुढील आदेश येईपर्यंत जनावरांचे बाजार आणि जत्रा बंद ठेवण्याच्या सूचना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत. लम्पी चर्म रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लाख लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अभियान स्वरुपात बाधित गावांच्या पाच किमी क्षेत्रात लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिली आहे. हा आजार केवळ गाई आणि बैलांना होत असून, त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका संभवत नसल्याचं पशुसंवर्धन आयुक्तांनी सांगितलं.


महत्त्वाच्या बातम्या: