Aurangabad Electricity Bill News: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील नवगाव येथील वायरमेनने महावितरण विभागाच्या परस्पर वीज बिलाची रक्कम ग्राहकांकड वसूल करून हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान चौकशीअंती या वायरमेनला अखेर निलंबित करण्यात आले आहे. संजय चाबुकस्वार असे निलंबित करण्यात आलेल्या वायरमेनचे नाव आहे. तर त्याच्या कारनाम्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात पाहायला मिळत आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून महावितरण विभागाकडून थकीत वीजबिल विरोधात कारवाई करत, वसुली केली जात आहे. दरम्यान याचाच फायदा घेत चाबुकस्वार यांनी ग्राहकांकडून वीज बिलाची रक्कम वसूल करून स्वतःच हडप केली.  नवगाव येथे कार्यरत असलेले महावितरणचे लाईनमन संजय चाबुकस्वार यांनी डिसेंबर 20121 पासून गावातील 13 शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे बिल भरण्यासाठी, घरगुती वीज बिल भरण्यासाठी, विज जोडणीसाठी पैसे घेतले. मात्र पावत्या दिल्या नाहीत. तर काही नागरिकांचे नादुरुस्त असलेले मीटर बदलून देण्यासाठी रोख रक्कम घेऊन मीटर देखील बदलून दिले नाही. धक्कादायक म्हणजे पैसे घेतलेल्या लोकांना कोटेशन व अधिकृत वीज कनेक्शन न देता चक्क त्यांना विद्युत पोलवरून अनधिकृत रित्या बिगर मीटरचे वीज कनेक्शन जोडणी करून देण्याचा प्रताप केला आहे. 


आणि प्रकरण समोर आले... 


पैसे देऊनही चाबुकस्वार कोटेशन देत नसल्याने नागरिकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी चाबुकस्वार यांच्याकडे तगादा लावला. मात्र प्रत्येकवेळी उडवाउडवीची उत्तर मिळत असल्याने नागरिकांनी थेट वरिष्ठांकडे तक्रार केली. तर घडलेला सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर वरिष्ठांनी याबाबत चौकशी सुरु केली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. तर चाबुकस्वार यांना अखेर निलंबित करण्यात आल्याची माहिती महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


नागरिकांच्या तक्रारी...


चाबुकस्वार यांच्याबाबत नवगाव येथील नागरिकांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संजय चाबुकस्वार याने वीज ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर बिलाच्या नावाखाली रक्कम वसूल केली. महावितरण विभागात ही रक्कम जमा न करता परस्पर हडपल्याचा आरोप वीजग्राहकांनी केला आहे. ग्राहकांची लेखी तक्रार महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदवून घेतली होती. तसेच सबंधित वायरमेनला निलंबित करण्याची मागणी वीज ग्राहकांनी या तक्रारीत केली होती. त्यामुळे अखेर चौकशी करून वायरमन संजय चाबुकस्वार यांना शनिवारी निलंबित करण्यात आले.


औरंगाबादचे पालकमंत्री भुमरेंच्या पुत्राच्या नावावर 1 लाख 31 हजारांची थकबाकी, शेतकऱ्यांची मात्र पैसे भरूनही वीज खंडित