Jalna News : लहान मुलांकडून खेळताना अनेकदा पैसे किंवा खेळेण्याच्या वस्तू तोंडावाटे पोटात गेल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. मात्र जालना जिल्ह्यातील (Jalna District) एका शेतकरी कुटुंबातील 33 वर्षीय तरुणाच्या फुप्फुसात चक्क सुई अडकली असल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या तरुणाच्या पोटात ही सुई तब्बल चार वर्षांपासून अडकलेली होती. त्यानंतर अडकलेली सुई शस्त्रक्रिया करुन बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले असून, तरुणाची प्रकृती ठणठणीत आहेत. औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) एका खासगी रुग्णालयात एक तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर सुई बाहेर काढली गेली असून, तरुणाला जीवदान मिळाले.


याबाबत अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील एका तरुणाने चार वर्षांपूर्वी शिलाई मशिनची सुई तोंडात धरली असतानाच त्याला अचानक खोकला आला. अचानक आलेल्या खोकल्यामुळे तोंडातील सुई थेट घशात गेली. घशात गेलेली सुई फुप्फुसात अडकली. मात्र काही दिवसांनी खोकला आल्यावर तरुणाच्या तोंडातून रक्त पडू लागले. तोंडात रक्त येत असल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची चिंता वाढली होती. 


शस्त्रक्रिया करुन फुफ्फुसात अडकलेली सुई बाहेर काढली


तरुणाच्या तोंडातून रक्त येण्याचे प्रमाण वाढल्याने नातेवाईकांनी औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी आणले असतानाच, त्याच्या उजव्या फुप्फुसाच्या खालच्या भागात सुई अडकल्याचे निदान झाले. त्यामुळे अखेर या रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ यांनी तरुणाची शस्त्रक्रिया करुन फुफ्फुसात अडकलेली सुई बाहेर काढली आहे. तसेच शस्त्रक्रियेच्या दोन दिवसांनंतर या तरुणाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या त्याची प्रकृती ठणठणीत आहे. 


गुंतागुंतीची शस्त्रक्रिया


जालना येथील तरुणाच्या तोंडातून रक्त येत असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी केली असता फुफ्फुसात सुई अडकली असल्याचे समोर आले. त्यामुळे शस्त्रक्रिया करुन ही सुई बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र फुफ्फुसात अडकलेली सुई बाहेर काढणं म्हणजेच यासाठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. मात्र एका खाजगी रुग्णालयात कान-नाक-घसा तज्ज्ञ असलेले डॉ. अमोल सुलाखे आणि त्यांच्या टीमने रुग्णाची शस्त्रक्रिया करुन फुफ्फुसात अडकलेली सुई बाहेर काढत त्यांना जीवनदान दिले आहे. 


लहान मुलांची काळजी घ्यावी


अनेकदा लहान मुलांना हातात आलेली प्रत्येक वस्तू तोंडात घालण्याची सवय असते. त्यामुळे अनेकदा चुकून एखादी वस्तू गिळली जाते. ज्यात पैशांचे कॉईन, खेळण्याची वस्तू याचा समावेश असतो. त्यामुळे मुलांच्या बाबतीत पालकांनी काळजी घेतली पाहिजे. तसेच लहान मुलं खेळत असताना त्यांच्या आजूबाजूला नुकसान होईल अशा वस्तू ठेवू नयेत याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Crime : चक्क घरातील बेडरुममध्येच तयार केला बनावट विदेशी मद्याचा कारखाना; ‘उत्पादन शुल्क'ची कारवाई