Aurangabad News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून,औरंगाबादमध्ये आज भाजप आमदार तथा सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घराबाहेर शिवभक्तांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी अतुल सावे यांनी आंदोलकांची भेट घेतली, तसेच आंदोलकांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्याची हमी दिली.
राज्यपालांच्या विधानावरून राजकीय नेत्यांच्या घरासमोर आठवडाभर ढोल बजाव आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा मराठा क्रांती मोर्च्याकडून शनिवारी करण्यात आली आहे. तर या आंदोलनाची सुरुवात सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर ढोल वाजवून करण्यात आली आहे. सावे यांच्या औरंगाबाद शहरातील शहानुर मिया दर्गा येथील घरासमोर हे आंदोलन करण्यात आले. तर यावेळी मंत्री सावे यांना, राज्यपालाने शिवरायांचा केलेल्या अवमानाची माहिती आपणास आहे का ?असल्यास आपण राज्यपाल हटावची मागणी केली आहे का ? असा जाब विचारण्यात आला असल्याची माहिती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.
आठवडाभर नेत्यांच्या घरासमोर आंदोलन...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे शनिवारी मराठा क्रांती मोर्चा आणि शिवभक्तांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. तर 'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव' हे साप्ताहिक आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून, दररोज विविध पक्षांच्या पुढार्यांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवून जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज सावे यांच्या निवास्थानी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.
राज्यपालांमुळे मंत्री गोत्यात...
नेहमीच आपल्या विधानामुळे चर्चेत राहणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल बोलतांना 'छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श असून, नितीन गडकरी सध्याचे आदर्श असल्याचं, वक्तव्य केले होते. त्यांच्या याच विधानावरून राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळत असून, शिवभक्त आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता मंत्र्यांच्या घरासमोर शिवभक्त आंदोलन करून, जाब विचारत असल्याने मंत्री गोत्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे फडणवीस सरकारचे 3 आणि केंद्राचे 2 मंत्री राहतात. त्यामुळे या पाचही मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्च्याकडून सांगण्यात आले आहे.
आजपासून 'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव' मोहीम; नेत्यांच्या घरासमोर शिवभक्त वाजवणार ढोल