Aurangabad Crime News: एकूण 75 लोकांना दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या एका कंपनीच्या संचालकाला चार वर्षांनंतर औरंगाबाद (Aurangabad) शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बंगळुरमधून अटक केली आहे. या आरोपीने दामदुपटीचे आमिष दाखवून 75 लोकांना 2 कोटी 22 लाख रुपयांचा गंडा घातला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यावर तो गेल्या चार वर्षांपासून सतत पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. मात्र आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी बंगळुरात त्याला बेड्या ठोकल्या आहेत. औरंगाबाद शहरात 2017 ते 2019 काळात गोरगरिबांना लुबाडणाऱ्या रिदास इंडिया कंपनीचा संचालक असलेला मोहम्मद अनिस आयमन (वय 24 वर्षे, रा. बंगळुरु) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर यातील दुसरा आरोपी मोहंमद आयुब हुसैन हा मयत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 


याप्रकरणी मोहम्मद रफी मोहम्मद ताहेर शेख (रा. सादातनगर) यांनी 13 डिसेंबर 2019 रोजी सिटी चौक ठाण्यात फिर्यादी दिली होती. ज्यात मोहंमद अनिस आयमन आणि मोहम्मद आयुब हुसैन दोन्ही बाप लेकांनी दामदुपटीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे जमा केले होते. या दोघांनी 75 लोकांना 2 कोटी 22 लाख रुपयांचा गंडा घातला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते. त्यांनी आतापर्यंत चार ते मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी बंद केले होते. त्यामुळे पोलिसांना ते सतत गुंगारा देत होते. मात्र अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल चा वर्षांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. 


बचावासाठी आरोपी केवळ इंटरनेट सीम वापरायचा... 


गुन्ह्याच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखा पोलीस यापूर्वी तीन वेळा बंगळुरुला गेले. मात्र प्रत्येकवेळी आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते. दरम्यान, सप्टेंबर 2022 मध्ये तपास अधिकारी सहायक निरीक्षक तृप्ती तोटावार, अंमलदार विठ्ठल मानकापे, संदीप जाधव, बाबा भानुसे हे बंगळुरुला गेले. तेव्हा मुख्य आरोपी मोहम्मद आयुब हुसैन हा मयत झाल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी मृत्यू प्रमाणपत्राच्या दुसऱ्या कॉपीची मागणी केली. तेव्हा आरोपी मोहम्मद अनिस आयमन याने काकांचा मोबाईल क्रमांक दिला होता. त्या क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून आधी त्यांचा शोध घेतला. त्यांना विचारपूस करून आरोपी मोहंमद अनिस आयमनला शोधले. तो मोबाईल सिम वापरत नव्हता. तो केवळ इंटरनेट सीम वापरत असल्याचे तपासात समोर आले. विशेष म्हणजे तो एका अलिशान फ्लॅटमध्ये राहत होता. 


लोकांच्या पैश्यात घेतली जमीन... 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुंतवणुकदारांच्या पैशातून औरंगाबाद जिल्ह्यातील सिद्धनाथ वडगाव येथे 60 एकर जमीन खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली होती. त्यामुळे जमिनीचे मालकी हक्काचे दस्तएवेज हस्तगत करून एमपीआयडी कायद्याप्रमाणे जमीन जप्त केली. तर या जमिनीचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जाणार आहेत. त्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून वैजापूरचे उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या: 


अबब! 2 लाख 40 हजार वाहनधारकांना दंड भरण्यासाठी एकाच दिवशी बोलावले; औरंगाबाद पोलिसांच्या आदेशाची सर्वत्र चर्चा