Aurangabad Rain News: औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 23 दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर अनेक भागात पिकं माना टाकत असल्याचे पाहायला मिळत आहे. जुलैमध्ये दोन वेळा आठवडाभर तर ऑगस्टमध्ये सलग चार दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे वार्षिक सरासरीच्या 89.6 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मात्र त्यानंतर गेली 23 दिवस पावसाचा पडलेला खंड शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा ठरत आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सोयगावमध्ये 22 दिवसांचा तर औरंगाबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोड या पाच तालुक्यांत 24 आणि कन्नड, खुलताबादेत 25 व फुलंब्रीत 27 दिवस पावसाने दांडी मारली आहे. यामुळे बळीराजाच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी...
तालुका | पावसाचे दिवस | टक्के |
औरंगाबाद | 7 | 75.9 |
पैठण | 7 | 97.1 |
गंगापूर | 7 | 113.3 |
वैजापूर | 7 | 132.1 |
कन्नड | 6 | 78.8 |
खुलताबाद | 6 | 61.4 |
सिल्लोड | 7 | 63.4 |
सोयगाव | 9 | 64.6 |
फुलंब्री | 4 | 89.6 |
आधी अतिवृष्टी आता पावसाचा खंड...
जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला सतत पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले. प्रशासनाकडून याचे पंचनामे सुद्धा करण्यात येत आहे. अशात उरल्यासुरल्या पिकांना आता जगवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहे. मात्र त्यातच आता पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वेळीच पाऊस न झाल्यास उरलेले पिकेही नष्ट होण्याची भीती आता बळीराजाला लागून आहे.
महत्वाच्या बातम्या...
Nanded Agriculture News : पावसाअभावी पिकं चालली वाळून, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संकटात