Aurangabad Gram Panchayat Election Results: राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. मात्र याचवेळी काही हटके निकाल देखील समोर येतांना पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा देखील असाच काही हटके निकाल हाती आला आहे. सख्या मावस भावांच्या बायका ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र मतमोजणी सुरु असतानाच दोन्ही उमेदवारांना समान मत मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढावी लागली. त्यानंतर एकीचा विजय तर दुसरीचा पराभव झाला आहे. 


कन्नड तालुक्यातील गराडा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन सख्या मावस भावांच्या अर्धागणी निवडणुकीत आमने सामने होत्या. पूजा सचिन राठोड या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर रेश्मा राहुल राठोड एकनाथ या शिंदे गटाकडून रिंगणात होत्या. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. तर आपणच विजय होणार असा दावा देखील दोन्ही गटाकडून करण्यात आला होता. दरम्यान मतमोजणी वेळी दोघींना 540 मतदान झाल्याने चिठ्ठी काढण्यात आली आहे. ज्यात पूजा सचिन राठोड यांचा विजय झाला आहे. 


आणखी दोन ठिकाणी समान मते...


दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी एका ग्रामपंचायतमध्ये समान मते पडल्याचे समोर आले आहेत. औरंगाबाद तालुक्यातील लायगाव ग्रामपंचायत सदस्य पदासाठी समान मत पडली आहे. नामदेव बोंगाणे आणि चंद्रकांत बोंगाणे यांना समान 189 मते पडली होती. त्यामुळे यासाठी चिठ्ठी काढावी लागली. एका लहान मुलीच्या हाताने काढण्यात आलेल्या चिठ्ठीनंतर चंद्रकांत बोंगाणे यांचा विजय झाला आहे. औरंगाबाददमध्ये समान मत पडण्याची ही दुसरी घटना आहे. 


सोबतच औरंगाबाद जिल्ह्यातील पिंपळगाव पांढरी येथे देखील दोन्ही उमेदवार यांना समान मते पडली आहे. जयश्री ठोंबरे आणि पुष्पा ठोंबरे यांना 145 समान मते पडली होती. त्यामुळे अखेर ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली ज्यात जयश्री ठोंबरे विजयी झाल्या आहेत.