Maharashtra Political Crisis: बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापना केली. तसेच मुख्यमंत्रीपदी शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सुद्धा झाला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले आहे. पण त्यापूर्वीच आपल्याला मंत्रीपद मिळावे यासाठी आमदारांकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्यासाठी औरंगाबाद येथील दोन आमदारांचे हजारो कार्यकर्ते आज मुंबईत धडकणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील शिंदे गटातील संदिपान भुमरे, संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार या तिन्ही आमदारांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा सुरु आहे. दरम्यान आज सकाळीच शिरसाट यांचे हजारो कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांना आपला पाठींबा देण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर संध्याकाळी अब्दुल सत्तार यांचे सुद्धा हजारो कार्यकर्ते मुंबईकडे निघणार आहे. त्यामुळे या दोन्ही आमदारांकडून मंत्रीपदासाठी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. मात्र भुमरे यांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांकडून असे शक्तिप्रदर्शन केले जाणार नसल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
एकाच जिल्ह्यात तीन मंत्रीपद?
औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या सात आमदारांपैकी पाच आमदार शिंदे गटात आहे. या पाचपैकी तीन आमदारांना मंत्रीपद हवे आहे. संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपद सोडून शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोघांकडूनही मंत्रिपदावर दावा केला जात असल्याची चर्चा आहे. त्यात शिंदे यांचे जवळचे समजले जाणारे संजय शिरसाट यांना सुद्धा मंत्रीपद हवे आहे. त्यामुळे एकाच गटातील तीन जणांना एकाच जिल्ह्यात मंत्रीपद शक्य आहे का? अशीही चर्चा सुरु आहे. त्यामुळे मंत्रीपद आपल्या पदरात पडण्यासाठी तिन्ही नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे.
भाजपकडूनही एक मंत्रिपद...
शिंदे गटातून कुणाला मंत्रीपद मिळणार याची चर्चा सुरु असतांनाच, भाजपकडून सुद्धा औरंगाबादसाठी एक मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. मराठवाड्याची राजधानी आणि आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता भाजपकडून एक मंत्रीपद औरंगाबादला दिले जाण्याची चर्चा आहे. भाजपकडून माजी मंत्री अतुल सावे यांना पुन्हा संधी मिळू शकते अशीही चर्चा आहे. त्यामुळे अंतिम निर्णय झाल्यावरच कुणाच्या पदरात काय पडणार हे स्पष्ट होईल.