Rain Update: हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवारी मराठवाड्यात रात्रीपर्यंत जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. औरंगाबाद, नांदेड, जालना, लातूर, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पाहायला मिळाले. तर मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 50 टक्के पाणीसाठा आला आहे. जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील धरणातून 71 हजार 534 क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी 52.07 टक्के झाला आहे. 


कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस...


मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात 89 मंडळांपैकी 79 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 24 तासांत 118 मि.मी पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 56.5 मि.मी पाऊस झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 44 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यात बुधवारी 57.8 मि.मी एवढा पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यात मागील 24  तासांत 36.40 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यातील 34 मंडळात 30 ते 61 ते 11 मंडळात 20 ते 30 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी 132.60 मि.मी,हिंगोली 61.40 मि.मी, वसमत 99.50 मि.मी, औंढा 74.50 मि.मी, सेनगाव 54.40 मि.मी अशी पावसाची नोंद झाली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यात बारा तासांत 39.4 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.


जलप्रकल्पात 50 टक्के पाणीसाठा 


मराठवाड्यातील 11 मोठ्या जलप्रकल्पात 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. ज्यात जायकवाडी 52.07 टक्के, विष्णुपुरी 84 टक्के,  माजलगाव 34 टक्के, सिदेश्वर 12 टक्के, येलदरी 58 टक्के, मांजरा 29 टक्के, निम्न तेरणा 53 टक्के, निम्न दुधना 68 टक्के, पेनगंगा 59 टक्के, मानार32 टक्के, सीना कोळेगाव 17 टक्के, 


नाशिकची आवक घटली...


नाशिक जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरी धरणात सुरु असलेला विसर्ग सुद्धा कमी झाला आहे. आज सकाळी 6 वाजेच्या आकडेवारीनुसार दारणा मधून 8 हजार 846 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तर कडवा 2 हजार 592 क्युसेक, गंगापूर धरणातून 8 हजार 880 क्युसेकने, आळंदी 243 क्युसेकने, होळकर ब्रिज 10 हजार 502 क्युसेकने, नांदूर-मधमेश्वर 40 हजार 521 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.