Aurangabad News: नवीन सरकार आल्यानंतर अनेक विकास कामांना स्थगिती देण्यात आली असतानाच आता औरंगाबाद शहरातील स्मार्ट सिटीतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांना सुद्धा ब्रेक लागला आहे. यापूर्वी होणाऱ्या 108 ऐवजी आता 24 रस्ते होणार असल्याची माहिती समोर आली आहे. निधीअभावी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे औरंगाबादकरांना आणखी काही दिवस खड्ड्यांच्या रस्त्यावरुनच प्रवास करावा लागणार आहे. 


औरंगाबाद शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असल्याने याचा त्रास औरंगाबादकरांना करावा लागत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी स्मार्ट सिटीअंतर्गत 317 कोटी रुपये खर्च करून 108 रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांनतर यासाठी निविदा सुद्धा काढण्यात आली होती. ज्यात हे काम ए.जी. कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. तसेच या कामासाठी मुंबई येथील आयआयटी संस्थेला त्रयस्थ संस्था म्हणून काम देण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेतला गेला. 


कामाला सुरवात झाली...


त्रयस्थ संस्था म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या आयआयटी संस्थेने शहरातील 22 रस्त्यांच्या डिझाइनला परवानगी दिली. यापूर्वी रस्त्यांच्या कामावरून झालेला आमदारांचा आरोप पाहता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 7  याप्रमाणे रस्त्यांची कामे सुरू करण्याचाही निर्णय झाला. विशेष म्हणजे यातील 12 कामांना सुरवात सुद्धा झाली आहे. 


आयुक्तांनी आढावा घेतला आणि...


एकीकडे 12 रस्त्यांचे कामाला सुरवात झाली असतांना दुसरीकडे, नुकताच पदभार घेणारे प्रशासक तथा मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी स्मार्ट सिटीच्या कामकाजाचा विभागनिहाय आढावा घेतला. यावेळी बैठकीत 317 कोटी रुपयांच्या रस्ते कामांचा मुद्दा सुद्धा समोर आला. आयुक्तांनी त्याचाही आढावा घेतला असता कंत्राटदाराने रस्त्यांची कामे सुरू करण्यास विलंब केल्याचे समोर आले. सोबतच निधीची तरतूद नसल्याने ही कामे थांबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला, असल्याचे समोर आले आहे. तर रस्त्यांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होणार नाही. त्यातच महापालिकेने आपला 250 कोटीचा हिस्सा यापूर्वीच जमा केला आहे. तसेच तत्कालीन आयुक्तांनी रस्त्यांची कामे थांबविण्याचे पत्र दिलेले आहे. त्यामुळे 108 ऐवजी केवळ 24 रस्त्यांची कामे स्मार्ट सिटीतून केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: 'त्या' बॅडमिंटनपटूसाठी इतिहासात पहिल्यांदाच खंडपीठाने स्वातंत्र्यदिनी घेतली सुनावणी


Aurangabad: वीरांची अग्निपरीक्षा! भरतीसाठी आलेल्या तरुणांना ना राहण्यासाठी जागा ना पिण्यासाठी पाणी