Aurangabad News: शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच आता शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसैनिकांची हकालपट्टी केली जात आहे. दरम्यान युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांची हकालपट्टी करण्याची घोषणा आजच्या सामनातून करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षातून हकालपट्टी होताच जंजाळ यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर लोकसभा निवडणुकीत खैरे यांना पाडण्याचे काम अंबादास दानवे यांनी केले होते. त्यामुळे खरे गद्दार तेच असल्याचा आरोप जंजाळ यांनी केला आहे. 


यावेळी बोलतांना जंजाळ म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मला जाणीवपूर्वक पक्षाच्या कार्यापासून दूरू ठेवले जात होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत सुद्धा मला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला.  दरम्यान मी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली म्हणून, माझी हकालपट्टी करण्यात आली. माझ्या हकालपट्टी करण्याची सर्वात जास्त घाई खैरे आणि अंबादास दानवे यांना होती. म्हणून गेल्या काही दिवसांपासून यासाठी त्यांचे मुंबईत प्रयत्न सुरु होते. 


दानवेचं खरे गद्दार


यावेळी बोलतांना जंजाळ म्हणाले की, खैरे यांना पाडण्याचे षडयंत्र कुणी केले हे सर्वांना माहित आहे. शिवसेनेतील गटप्रमुखांची यंत्रणा ठप्प करण्यात आली. लोकसभेत खैरे यांना प्रत्येक बूथवर दोन मतदान सुद्धा झाले असते तरी ते निवडून आले असते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत खैरे यांना पाडण्यासाठी प्रयत्न करणारे अंबादास दानवे हेच खरे गद्दार असल्याची टीका जंजाळ यांनी केली आहे. 


बंडखोर आमदारांच्या मुलांची हकालपट्टी का नाही?


तसेच माझा प्रश्न आहे की, बंडखोरी करणाऱ्या सर्वच आमदारांची मुलं युवा सेनेमध्ये काम करतात, त्यांची का हकालपट्टी झाली नाही असा प्रश्न जंजाळ यांनी उपस्थित केला. आमदार दादा भुसे यांचा मुलगा युवा सेनेत आहे, प्रताप सरनाईक यांचे दोन्ही मुलं युवासेनेच्या कोअर कमिटीमध्ये काम करतात.  आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा युवासेनेत काम करतो. मात्र यांची कुणाचाही हकालपट्टी न करता एका सामन्य कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. माझं कुणीही राजकारणात नसल्याने त्यांना हा निर्णय घेण्यासाठी सोपं पडलं असेल, असेही जंजाळ म्हणाले.