Mahavitaran Strike: राज्याच्या वीज कामगार संघटनांनी आज मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा संप (Mahavitaran Strike) पुकारला असून, याचे परिणाम आता राज्यभरात जाणवत आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) देखील या संपाचे झळ नागरिकांना बसतांना पाहायला मिळत आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी आता वीज पुरवठा खंडीत होत असल्याची माहिती समोर येत आहे. तर महावितरण कर्मचारी संपावर गेले असल्याने वीज पुरवठा कोण सुरु करणार असा प्रश्न पडत आहे. जिल्ह्यातील औरंगाबाद, पैठण आणि वैजापूर तालुक्यात काही ठिकाणी वीज पुरवठा बंद पडला आहे. 


अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्यातील महावितरण कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिली आहे. या संपात औरंगाबाद परिमंडलातील सुमारे 4 हजार 500 अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहे. त्यामुळे याचे परिणाम औरंगाबादच्या ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. औरंगाबाद ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला असल्याचे समोर येत आहे. 


'या' भागात वीजपुरवठा खंडीत 


औरंगाबाद वैजापूर शहरात सकाळपासून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत आहे. तसेच परिसरात अनेक भागात देखील वीज खंडीत आहे. तर वैजापूर शहरातील जीवन गंगा सोसायटी परिसरात अर्धा तास वीज पुरवठा खंडित होता, मात्र काही वेळाने वीजपुरवठा सुरु झाला आणि सध्या तरी वीज पुरवठा पुर्ववत सुरू आहे. तसेच वैजापूर तालुक्यातील शिवराई महावितरण कार्यालयाच्या अंतगर्त असलेल्या बोर दहेगाव, करंजगाव,पालखेड, गोळवाडी,बेंदवाडी यासह 10 गावांचा वीजपुरवठा खंडीत आहे. तसेच महालगाव 33 KV कार्यालय अंतर्गत 10 ते 15 गावातील वीजपुरवठा बंद झाला आहे. 


औरंगाबाद तालुक्यातील करमाड परिसरात पहाटे चार वाजेपासून वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. 


पैठण तालुक्यात देखील काही ठिकाणी वीजपुरवठा बंद पडला आहे. बिडकीन गावातील कोकणवेस येथील रोहित्र सकाळपासून बंद आहे. तसेच पैठणच्या दावरवाडी महावितरण कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या नानेगाव येथील वीजपुरवठा सकाळपासून बंद आहे. 


महावितरण कर्मचाऱ्यांचे निदर्शने...


अदानी इलेक्ट्रिकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात महावितरण कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. दरम्यान औरंगाबाद परिमंडलातील सुमारे 4  हजार 500  अधिकारी, कर्मचारी या संपात सहभागी झाले आहे. तर औरंगाबादच्या मिल कॉर्नर परिसरातील महावितरण कार्यालयासमोर संपकरी कर्मचाऱ्यांकडून निदर्शने करण्यात येत आहे. यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खाजगीकरणाला विरोध दर्शवला. तसेच यावेळी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात घोषणाबाजीचे होर्डिंग घेतल्याचे पाहायला मिळाले. तर संपकरी कर्मचारी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढणार आहे.