Aurangabad News: महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात जात असल्याच्या आरोपावरून गेल्या काही महिन्यात राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये याच मुद्द्यावरून आजही आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. आता अशातच औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील वाघ गुजरातला पाठवण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापतांना पाहायला मिळतोय. कारण या निर्णयाला काँग्रेसने आक्रमकपणे विरोध केला आहे. तर याविरोधात आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला आहे.


राज्यातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असल्याचा आरोप सतत विरोधी पक्षातील नेत्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश उद्योग गुजरातमध्ये जात असल्याचाही आरोप केला जात आहे. दरम्यान आता औरंगाबाद मधील सिद्धार्थ उद्यानातील वाघ गुजरातला पाठवला जाणार आहे. तर त्याच्या मोबदल्यात कोल्हा, इमू यासह इतर काही प्राणी मिळणार आहेत. विशेष म्हणजे याबाबत आलेल्या प्रस्तावाला औरंगाबाद महानगरपालिकेने मंजुरी दिली आहे. मात्र औरंगाबाद मधील वाघ गुजरातला जाऊ देणार नसल्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.


काँग्रेसची भूमिका... 


याबाबत काँग्रेसने मनपा आयुक्तांना लिहिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, औरंगाबाद शहरातील सिध्दार्थ उद्यानमधील वाघ गुजरातला घेऊन जाणार अशी माहिती आम्हाला मिळाली. वाघाच्या बदल्यात औरंगाबाद सिध्दार्थ उद्यानात कोल्हा देणार अशी माहितीही मिळाली आहे. मात्र यासाठी आम्ही सिध्दार्थ उद्यानातील वाघ कदापिही गुजरातला घेऊन जाऊ देणार नाही. राज्यभरातून सिद्धार्थ उद्यानात पर्यटक येतात. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानातील वाघ जर गुजरातला नेला तर, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेस औरंगाबाद शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी दिला आहे.


यामुळे गुजरातला पाठवणार वाघ 


सिद्धार्थ उद्यानातील बहुतेक प्राण्यांच्या जोड्या असून, दुसरीकडे सायाळ, स्पूनबिल पक्षी, इमू आणि कोल्हा हे प्राणी मात्र एकेकच आहेत. त्यामुळे त्यांना जोडीदार मिळावा म्हणून गेल्या काही दिवसांपासून महापालिकेचे प्रशासन प्रयत्नशील होते. त्या अनुशंगाने महानगरपालिका प्रशासनाकडून देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. दरम्यान गुजरातच्या अहमदाबाद येथील प्राणिसंग्रहालयाने हे प्राणी सिद्धार्थ उद्यानासाठी देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र या प्राण्यांच्या बदल्यात त्यांनी दोन पिवळे मादी वाघ देण्याची अट टाकली होती. 


त्यानंतर पुढे यावरून दोन्ही ठिकाणच्या प्राणिसंग्रहालय प्रशासनात सविस्तर चर्चा झाली. पुढे प्राणी अदलाबदल करण्याबाबतचा प्रस्ताव 7 जुलै 2022 रोजी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला प्राधिकरणाने 7 ऑक्टोबर 2022 मंजुरी दिली. त्यानंतर प्राणिसंग्रहालय प्रशासनाने प्राण्यांचे प्रत्यक्ष हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सादर केला होता. त्याला मनपा आयुक्त चौधरी यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत सिद्धार्थ उद्यानातून 26 वाघ देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे.