Maharashtra vs Karnataka Issue: कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायाला मिळत आहे. दरम्यान याच मुद्यावरून औरंगाबादमध्ये युवा सेना आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. आज सकाळी (बुधवार) शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात कर्नाटकमध्ये जाणाऱ्या गाड्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. सोबतच भगव्या रंगाने बसवर जय महाराष्ट्र सुद्धा लिहिले. 


कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील सीमावादावरून तणावाचे वातावरण आहे. दरम्यान काल बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे याचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहे. औरंगाबादमध्ये देखील आज कर्नाटक बसला काळं फासण्यात आले आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे. तर काळे फासण्यात आलेल्या बस सुरक्षित ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. तर घटनास्थळी पोलीस देखील पोहचले असल्याचे बोलले जात आहे.


जोरदार घोषणाबाजी...


औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकात सकाळी साडेपाच वाजता युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे आंदोलन सुरु केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळे फासत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार, महराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्नाटक बसवर असलेल्या नावाला देखील काळे फासण्यात आले. त्यामुळे काही वेळेसाठी बस स्थानकावर गोंधळ उडाला होता. मात्र त्यानंतर युवा सेनेचे कार्यकर्ते निघून गेले. 


महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पुन्हा स्थगित


कर्नाटक-महराष्ट्रातील सीमावाद तापत असून, याचे परिणाम दोन्ही राज्यातील बसवर पाहायला मिळत आहे. दरम्यान महाराष्ट्रातून आज सुरु झालेली बससेवा पुन्हा तात्पुरती स्थगित झाली आहे. कोल्हापूरमधून बेळगाव आणि निपाणीच्या दिशेने दोन बसेस रवाना झाल्या आहेत. या बसेस तेथून पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने येत आहेत. परंतु  त्यानंतर दोन्ही राज्यातील परिस्थिती पाहता बससेवा पुन्हा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. दुसरीकडे कर्नाटक परिवहनची एकही बस महाराष्ट्रात आलेली नाही. 


राजकीय वातावरण तापले...


सीमावादावरून सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर राजकीय वातावरण तापले आहे. तर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर अनेक ठिकाणी राजकीय पक्षाकडून कर्नाटकच्या बसेसला काळे फासले जात आहे. तर 48 तासात यावर निर्णय घ्यावा अन्यथा मला बेळगावात जावे लागेल असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. तर शरद पवारांना कर्नाटकात जाण्याची वेळ येणार नसल्याचं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे सीमा वादावरून राजकीय वातावरण देखील तापले आहे.