Aurangabad Crime News: दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या पैठणमध्ये एकाने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात फावडे घालून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा अशीच घटना शहरातील वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचा हद्दीतील घाणेगाव येथे घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन आधी आपल्या पत्नीचे केस कापले आणि त्यानंतर रात्रभर बेदम मारहाण करून डोक्यात लोखंडी सळाई मारून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीबाई संतोष जाधव (वय 36 वर्षे ) असे मृत महिलेचे नाव असून,  संतोष जाधव असे आरोपी पतीचे नाव आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाणेगाव येथील संघर्षनगरात वास्तव्यास असणाऱ्या संतोष जाधव याचे लक्ष्मी यांच्यासोबत 17 वर्षापूर्वी विवाह केला होता. तर लक्ष्मीबाई यांना पहिल्या पतीपासून एक मुलगा व एक मुलगी होती. तसेच संतोष जाधवपासून पासून 14 वर्षांचा एक मुलगा आहे. लग्नानंतर सुरवातीला काही दिवस सुखाने संसार सुरु होता. दरम्यान काही दिवसांनी संतोष लक्ष्मी यांच्या  चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना सतत मारहाण करू लागला. दुसऱ्या लग्नानंतर संसार मोडू नये या भीतीने लक्ष्मी गुपचूपपणे अत्याचार सहन करीत होत्या. 


पत्नीचे केस कापले... 


सततच्या त्रासाला कंटाळूनही लक्ष्मी या संतोषचा अत्याचार सहन करत होत्या. मात्र दोन दिवसांपूर्वी संतोषने हद्दच पार केली आणि लक्ष्मी यांच्या डोक्यावरचे केस कापून विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देखील आपल्या 14 वर्षाच्या मुलासमोर लक्ष्मीला रात्रभर मारहाण केली. त्यानंतर गुरुवारी पहाटे 3  वाजेच्या सुमारास संतोषने पुन्हा मारहाण केली. यावेळी त्याने लोखंडी सळईने लक्ष्मी यांच्या डोक्यात वार केल्याने त्या गंभीर जखमी होऊन मृत झाल्या. पत्नीचा मृत झाल्याची खात्री पटताच आरोपी संतोषने आपल्या आई-वडिलांशी संपर्क करुन आपण लक्ष्मीचा खून केल्याचे सांगितले. 


आरोपी पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात... 


घाणेगावात पतीने पत्नीची हत्या केल्याची माहिती मिळताच एमआयआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळची पाहणी करून याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. तर आरोपी संतोष जाधव याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे 14 वर्षाच्या मुलाने पोलिसांना वडिलाने रात्रभर मारहाण करुन आई लक्ष्मीचा खून केल्याचे सांगितले.