Aurangabad News: गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चेत असलेली शिवसेनेतील बंडखोरीच्या चर्चांना एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर लगाम लागला आहे. तर बंडखोरी करणारे आमदार सुद्धा मुंबईत परतले. मात्र अजूनही हे आमदार आपल्या मतदारसंघात गेलेले नाहीत. तर काहींनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरच मतदारसंघात पाय ठेवणार असल्याचा निश्चय केला आहे. असे असताना माजी मंत्री तथा पैठण मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे बंडखोरीनंतर आज पहिल्यांदाच जिल्ह्यात परतणार आहे. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी जोरदार तयारी  केली आहे. 


मुंबई, सुरत, गुवाहाटी, गोवा आणि परत मुंबई असा प्रवास करून आलेले भुमरे आज संध्याकाळी चार वाजता औरंगाबादच्या विमानतळावर दाखल होणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी गेलेले भुमरे थेट राज्यातील सत्ता बदल्यानंतर आपल्या जिल्ह्यात पाय ठेवणार आहे. तर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या बंडखोरी नाट्यात भुमरे यांचे नाव आघाडीवर होते.  ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा त्यांनी बंडखोरी केल्याने त्यांची चर्चा होती. 


समर्थकांकडून जल्लोषाची तयारी...


भुमरे हे गेली पंचवीस वर्षे पैठण मतदारसंघाच नेतृत्व करतात. ठाकरे सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. सोबतच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीनंतर पैठण येथील बहुतांश शिवसैनिकांनी शिंदे गटात राहणे पसंद केले. राज्यातील सत्तांतरानंतर भुमरे पहिल्यांदा जिल्ह्यात परत येत आहे, त्यात मंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची पुन्हा चर्चा आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि जल्लोष साजरा करण्यासाठी समर्थकांनी जोरदार तयारी केली असल्याचे पाहायला मिळत आहे.