Rain Update: रात्रीपासून मुंबई आणि कोकणातील बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता मराठवाड्यात सुद्धा पुढील आठवडाभर जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सोबतच वादळी वाऱ्याची शक्यता सुद्धा हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.   


हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा,जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळ वारा व विजेच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 6 आणि 7 जुलैदरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


शेतकऱ्यांना दिलासा...


गेली दोन आठवडे औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्हा सोडला तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती.  त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत होते. मात्र आता आठवडाभर विभागात दमदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाचे डोळे आता वरुणराजाकडे लागले आहेत. 


उत्पनावर परिणाम...


मराठवाड्यात बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहेत. तर अजूनही काही पेरण्या बाकी आहेत. 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नयेत असा सल्ला कृषी विभागाने दिला होता. त्यामुळे चांगल्या पावसाची वाट पाहता बऱ्याच पेरण्या अजून शिल्लक आहे. मात्र उशिरा पेरणी केल्यास उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या होत्या. मात्र चांगला पाऊस झाला तरच ही पिकं जगू शकणार आहे. त्यामुळे आजपासून पडणारा पाऊस या पिकांसाठी जीवनदान ठरणार आहे.


पावसाच्या संबधित महत्वाच्या बातम्या 


Kokan Rain : कोकणात पावसाचं थैमान; नद्यांनी ओलांडली पाण्याची इशारा पातळी, खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधकाऱ्यांना निर्देश


Maharashtra Rain: मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा