Aurangabad News: गेल्या काही वर्षात भाजपने इतर पक्षातील अनेक नेत्यांना प्रवेश दिल्याने त्यांच्यावर आयारामाचा पक्ष असल्याची टीका झाली. मात्र आता यापुढे भाजपमध्ये इतर पक्षातील नेत्यांचे प्रवेश होणार नसून,  त्याऐवजी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते फोडा, तसेच नवीन मतदारांची नोंदणी करून जिल्ह्यात किमान एक लाख मते वाढवा, असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या भाजप मेळाव्यात त्यांनी उपस्थितीत कार्यकर्त्यांना हा सल्ला दिला आहे.  


संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या भाजपच्या शक्तिकेंद्र प्रमुखांच्या मेळाव्यात बोलत असतांना बावनकुळे म्हणाले की, भाजपमध्ये आता इतर पक्षांच्या नेत्यांना प्रवेश दिले जाणार नाहीत. त्याऐवजी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते फोडा, तसेच नवीन मतदारांची नोंदणी करून जिल्ह्यात किमान एक लाख मते वाढवा. या पद्धतीचा अवलंब करून भाजप शिंदे गटाचा खासदार औरंगाबादेत 'निवडून आणा, असा कानमंत्र बावनकुळे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिला. 


महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले, तरी 51 टक्के मतांच्या आधारावर बूथवरील लढाई भाजपला जिंकायची आहे. भाजपच्या शक्तिकेंद्र प्रमुखांनी मविआच्या प्रत्येकी 25 कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणावे. त्यामुळे या पद्धतीने काम केल्यास  जिल्ह्यात खासदार, नऊ आमदार तर निवडून येतीलच, परंतु महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्षही भाजपचाच होईल, असे बावनकुळे म्हणाले.


शिंदे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात भाजप जोरात...


शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केली आहे. मात्र असे असतांना भाजपकडून शिंदे गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघात पक्षाला मजबूत करण्याचे काम जोरात सुरु आहे. औरंगाबाद पश्चीम मतदारसंघात भाजपच्या नेत्यांकडून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष मजबूतीचे काम सुरु आहे. तर भाजप नेते राजू शिंदे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. 


आगामी निवडणुकीची तयारी...


आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लक्षात घेता भाजप कामाला लागलं असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील सर्वच वार्डातील भाजप पदाधिकारी सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच एक केंद्रीय मंत्री आणि दुसरे राज्यातील कॅबिनेट मंत्रीपद भाजपकडे असल्याने त्याचा मोठा फायदा पक्षबांधणीसाठी होत आहे. तर आगामी निवडणूकीच्या दृष्टीने पक्षाकडून सतत आढावा घेतला जात असून, भाजपची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Dasara Melava : शिंदे-शिवसेनेत वाद सुरु असतानाच राज्यात आणखी एक 'दसरा मेळावा' होणार


गौप्यस्फोट! 'दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी दिला होता मुख्यमंत्र्यांना सल्ला'