Aurangabad: येत्या जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस, शिवसेनेसोबत आघाडी, करून लढण्याची शक्यता नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चार दिवसांपूर्वी औरंगाबादेत केले होते. मात्र यावरच बोलतांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil) मात्र, आमच्या स्थानिक नेत्यांना इतर पक्षातील स्थानिक नेत्यांशी बोलण्याचे सांगितले असून, तिथे त्यांचे जुळत असेल तर त्यांनी एकत्र लढण्यास हरकत नाही, असे म्हणत या विषयाला सोयीस्कर पणे बगल दिली. पाटील हे औरंगाबाद दौऱ्यावर असून, त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला.
माध्यमांना प्रतिक्रिया देतांना जयंत पाटील म्हणाले की, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष म्हणून अशा बैठका घ्यायच्या असतात त्याच बैठका सुरू आहे. महाविकास आघाडी एकत्र लढणार का? तर याबाबत सांगताना आम्ही स्थानिक नेत्यांना स्थानिक पक्ष सोबत बोलण्यास सांगितले आहे. जर तिथे त्यांचे जुळत असेल तर त्यांनी एकत्र लढण्यास हरकत नाही. प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस आणि शिवसेनेच्या लोकांसोबत बोलावे असे स्थानिक नेत्यांना सांगितलेलं असून ते ठरवतील, असे सांगत महाविकास आघाडी एकत्र लढणार या विषयाला सोयीस्कर पणे जयंत पाटलांनी बगल दिली.
पुढे बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, नाणार प्रकल्पाला पर्यावरणाच्या दृष्टीने विरोध होता बाकी नव्हे, उद्योग आले पाहिजे राज्यातील लोकांना रोजगार मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे असं पाटील म्हणाले. तर ग्रामपंचायत निवडणुका या चिन्हावर होत नसतात, त्या स्थानिक निवडणुका असतात त्यामुळे कुठला पक्ष पुढे मागे असे यात होत नसतं असेही पाटील म्हणाले.
विरोधकांवर टीका..
यावेळी विरोधकांवर टीका करतांना जयंत पाटील म्हणाले की, निर्मला सीतारमण यांचे मिशन बारामती सुरू आहे. तर बारामतीत येऊन त्यांनी महागाई का वाढली, बेरोजगारी का वाढली आहे, कर प्रमाण का वाढला याबाबतही मार्गदर्शन करावे असे जयंत पाटील म्हणाले. रामदास कदम हे उद्धव ठाकरेंबाबत जे बोलले त्यावर बोलताना भाषा, दर्जा घसरत चालला आहे. ती लोक नैराश्यात आहे म्हणून अस बोलताय असे जयंत पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर टीका...
मुख्यमंत्री तर भाषण लिहून दिल्यावरच बोललात, वाचून दाखवतात ते भाषण गुलामगिरीमध्ये आहेत असा टोला पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. तर एकनाथ शिंदे जसे काम करताय त्यावर निश्चितपणे फडणवीस नाराज आहेत आणि त्यांनी सावध सुद्धा राहावे असे पाटील म्हणाले. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाही. भाजपचं उदिष्ट साध्य झाले की ते सरकार पाडतील आणि त्यानंतर शिंदे यांना चूक झाल्याचं कळेल असेही पाटील म्हणाले.